नाशिक : भाजी विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर टाकून जागांची निश्चिती करून दिल्यानंतरही शहरातील भाजी बाजार सुरळीत होऊ शकले नाहीत. परिणामी, ग्राहकांची सणासुदीच्या दिवशीही ससेहोलपट कायम राहिली. सातपूर येथे टपारीया कंपनीसमोरील मोकळ्या जागेत भाजी बाजारास अनुमती देण्यात आली परंतु, विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने मांडल्याने हजारो नागरीकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. परिणामी, अवघ्या काही वेळाताच पोलीस व मनपाने सदरचा भाजी बाजार कायमस्वरुपी बंद केला. नाशिकरोड येेथे गर्दी होणाऱ्या उड्डाण पुलाखालील भाजी बाजारासही अनुमती नाकारण्यात आली असून काॅलनी व सोसायटी परीसरात विक्रेत्यांनी दुकान लावावी, अशा सुचना करण्यात आल्या आहेत. सिडकोत मात्र पोलिसांच्या धाकाने नागरीकांनी बाहेर पडण्यास नकार दिल्याने भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला. पंचवटीत मात्र, महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला विक्री करण्यात आली. त्यामुळे अपवाद वगळता तिसऱ्या दिवशीही भाजी विक्रेत्यांची व ग्राहकांची ससेहोलपट कायम राहिली.
भाजी विक्रेत्यांची परवड, ग्राहकांची ससेहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:52 AM