देवळाली कॅम्प : यंदा अतिवृष्टीमुळे धरणे, बंधारे भरलेले असताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लामरोड परिसरात अनेक भागात पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. नव्या-जुन्या पाइपलाइन असा फरक प्रशासन करत असल्याने पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.लामरोड भागातील जुन्या पाइपलाइनमुळे नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सांगूनदेखील उपाययोजना करण्यात आल्या नाही. पाण्याच्या प्रश्न महत्त्वाचा असल्याने लामरोड परिसरातील ज्योती दलवानी, शोभा आमेसर, सुरेश छाप्रू, संगीता नाणेगावकर, रोहिणी कुलथे, लक्ष्मी धनगर, सुजाता टाकळकर आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी सोडविण्याची विनंती केली. अनेकांनी तर पाण्याऐवजी फक्त हवा येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बिले भरत असल्याचे सांगितले. मुख्यधिकारी अजय कुमार यांनी लागलीच पाणी विभागाचे अधीक्षक रमेशचंद्र यादव यांना बोलावत नागरिकांकडून वाढत्या तक्रारींवर तोडगा काढण्याबाबत सुचविले आहे. त्यानुसार वॉर्ड क्रं.३ व ४ मधील नागरिकांनाच हा प्रश्न अधिक भेडसावत असल्याने या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइनची व्यवस्था करण्याबाबत बोर्डाकडून सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही नागरिकांना देण्यात आली. उपस्थितांनी अधिकारी वर्ग फक्त आश्वासन देतात नागरी प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.सात लाख रुपये खर्च ‘पाण्यात’लामरोड परिसरातील महिनाभरात पाण्याची टंचाईबाबत रोज नवनवीन परिसराच्या तक्रारी वाढतच आहे. लामरोड परिसरातील गोडसे मळ्यात देवीदास गोडसे यांच्या मळ्यापर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाने सात लाख रुपये खर्च करून नवीन दोन इंची पाइपलाइन टाकली गेल्या महिना दीड महिन्यात अर्धा इंची नळाला पाण्याऐवजी हवाच येत असल्याने गोडसे कुटुंबीयाला पूर्वीप्रमाणे शेजारच्या मळ्यातून पाणी आणावे लागत आहे.
देवळाली कॅम्पवासीयांची पाण्यासाठी परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:10 AM