नाशिक : मूळ अफगाणी असलेल्या अवघ्या २९ वर्षीय युवा सुफी उपदेशक जरीफ बाबा चिश्ती यांनी चार वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर केले. ते निर्वासित म्हणून भारतात आश्रयास होते. मंगळवारी (दि.५) त्यांची गोळी झाडून येवल्यात हत्या करण्यात आली. चिश्ती यांनी सुमारे तीन कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्यांच्या खूनप्रकरणी सहा संशयित निष्पन्न झाले आहेत. याच संपत्तीच्या वादातून जरीफ बाबांचा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफ बाबा हे मूळ अफगाणिस्तानाचे नागरिक आहेत. ते सुफी संत असल्याचा दावा सोशल मीडियावर करत होते. जरीफ चिश्ती यांची मंगळवारी संध्याकाळी नाशिकच्या येवला येथील चिचोंडी गावातील एमआयडीसी परिसरात गोळी झाडून हत्या केली गेली. याप्रकरणी फरार संशयित हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. नाशिक स्थानिक गुन्हे शाखा, येवला पोलीस गुन्हे शोध पथकासह तीन पथके हल्लेखोरांच्या मागावर आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून जरीफ चिश्तीच्या मृत्यूबाबत अफगाणिस्तानच्या वाणिज्य दुतावास कार्यालयालाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जोपर्यंत अफगाणिस्तान दुतावासाकडून काही सूचना नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त होत नाही, तोपर्यंत चिश्ती यांचा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात जतन करून ठेवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, दीड वर्षांपासून नाशिकच्या सिन्नरजवळ बाबा वास्तव्यास होते; मात्र ते कधीही नाशिक शहरात फिरकले नाहीत. त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच आपला राबता वाढविलेला होता.
---
‘यू-ट्यूब’कडून मिळत होते लाखो रुपये
चिश्ती बाबा निर्वासित नागरिक असल्यामुळे ते सर्व जंगम मालमत्तेचे व्यवहार आपल्या अन्य स्थानिक सेवेकऱ्यांच्या नावाने करत होते. यू-ट्यूबवर त्यांच्याकडून अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लोकांकडून पसंती मिळू लागल्याने यू-ट्यूबकडूनही बाबांना लाखो रुपये महिन्याकाठी मिळत होते. बाबाच्या यू-ट्यूब चॅनलवर सुमारे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि एक लाख इतके सबस्क्राइबर आहेत. मागील वर्षी यू-ट्यूबकडून त्यांना प्रमाणपत्र व सन्मानपत्रही देण्यात आले होते. बाबाने तो व्हिडिओसुद्धा तयार करून आपल्या यू-ट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.
--इन्फो--
अधूनमधून बाबा वादाच्या भोवऱ्यात
यू-ट्यूबवर जरीफ बाबांचे व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्याही कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे यू-ट्युबर म्हणून बाबा लोकप्रिय झाले होते; मात्र ते अधूनमधून आपल्या निराधार इस्लामिक धार्मिक वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असायचे. त्यामुळे त्यांच्यावर मुस्लीम सुन्नी पंथीयांच्या वरिष्ठ धर्मगुरूंकडूनदेखील टीकेची झोड उठत होती.
---इन्फो---
शिर्डीमधील व्हिडिओ ठरला अखेरचा...
जरीफ बाबा यांनी सोमवारी (दि.४) अर्थात हत्येच्या एक दिवस अगोदर शिर्डी येथे काही भाविकांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तेथील भेटीचा व्हिडिओ हा त्यांचा यू-ट्यूबवरील अखेरचा व्हिडिओ ठरला. या व्हिडिओ सुमारे ५२ हजारांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे.