नाशिक : जलप्रकल्पातील पाण्याचे सर्वांना न्याय्य पद्धतीने वाटप करणाऱ्या वाघाड प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, दक्षिण आफ्रिकेतील अभियंत्यांचे पथक त्याचा अभ्यास करण्यासाठी मंगळवार, दि. ३ रोजी येणार आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते तथा माजी आमदार बापूसाहेब उपाध्ये यांनी समान पाणी वाटपाची चळवळ राबविली. धरणाच्या लगत (हेड) असणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ झाला पाहिजे तसेच शेवटच्या टोकावरील (टेल) शेतकऱ्यांनादेखील सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. यासाठी होणारा संघर्ष मोडीत काढण्यासाठी पाणी व्यवस्थापन आणि वाटप संस्था त्यांनी वाघाड परिसरात स्थापन केली. १९८४ मध्ये वाघाड धरण पूर्ण झाले आणि १९९० मध्ये हा पाणीवापर संस्थेचा प्रयोग राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ठिकठिकाणी असे प्रयोग राबविले जात आहेत. या प्रयोगाची शासकीय पातळीवर दखल घेतल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे कामकाज सुरू आहे. त्याची दखल घेऊन दक्षिण आफ्रिकेतील १९ अभियंत्यांचे पथक मंगळवार, दि. ३ रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे. ओझर, जानोरी, मोहाडी अशा विविध ठिकाणी पाहणी करून वाघाड प्रकल्पाला ते भेट देणार आहे, अशी माहिती समाजपरिवर्तन केंद्राचे भरत कावळे यांनी दिली. पाण्याची मोजणी कशी होते, त्याचे प्रत्यक्ष वितरण कसे होते, पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत झालेला बदल याची माहिती आणि पाहणी करतानाच हे पथक थेट शेतकऱ्यांंशी संवाद साधणार आहे.
वाघाडच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आफ्रिकेतील अभियंते नाशकात
By admin | Published: February 03, 2015 12:52 AM