नाशिक : बँकिं ग व्यवहाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध बँकांनी त्यांचे मॅग्नेटिक स्ट्रिपचे एटीएम तथा डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित बँका त्यांच्या ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्रिपचे कार्ड बदलून ३१ डिसेंबरपर्यंत ईव्हीएम चिपचे कार्ड घेण्याचे आवाहन मोबाइल संदेशाच्या माध्यमातून करीत आहे. गेल्या वर्षी काही राष्ट्रीयीकृत बँकांनी अशाप्रकारे मॅग्नेटिक स्ट्रिपचे कार्ड बदलून ईव्हीएम चिपचे कार्ड दिले असून, आता स्थानिक सहकारी बँकांसह सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील प्रादेशिक बँकाही अशाप्रकारे मॅग्नेटिक स्ट्रिपचे कार्ड ब्लॉक करणार असल्याने ग्राहकांनी ३१ डिसेंबरपर्यंत स्थानिक शाखेतून आपले डेबिट तथा एटीएम कार्ड बदलून घेण्याचे आवाहन विविध बँकांमार्फत करण्यात आले आहे.मॅग्नेटिक स्ट्रिप कार्डच्या मागील बाजूला एक काळी पट्टी दिसून येते. ही काळी पट्टी म्हणजेच मॅग्नेटिक स्ट्रिप असून, याच पट्टीत बँक खात्याची संपूर्ण माहिती गोपनीय पद्धतीने समाविष्ट केलेली असते. त्यामुळेच एटीएममध्ये हे कार्ड टाकून आपला गोपनीय संकेतांक टाकताच आपल्या खात्यातून पैसे निघतात. परंतु अशा कार्डच्या बाबतीत कार्ड क्लोनिंगसह माहिती चोरीचे प्रकार समोर आल्यानंतर बँकांनी सुरक्षिततेची खबरदारी म्हणून अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. त्यानुसार ईव्हीएम चिप कार्ड असलेले डेबिट कार्ड आणण्यास बँकांनी सुरुवात केली आहे. या कार्डमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लहान आकाराची ईव्हीएम चिप वापरण्यात आली आहे. या चिपमध्ये खातेधारकाच्या खात्याविषयीची संपूर्ण माहिती साठवलेली इनक्रि प्टेड स्वरूपात असल्याने अशी माहिती कोणालाही चोरी करणे शक्य होत नाही. परंतु ही माहिती गोपनीय संकेतांकाच्या माध्यमातून पाहणे शक्य होणार असल्याने जगभरात डेबिट कार्डच्या तंत्रज्ञानात आता ईव्हीएम चिपचा वापर होऊ लागला असून, भारतातही आता ३१ डिसेंबरनंतर सर्वत्र असे ईव्हीएम तंत्रज्ञानावर आधारित डेबिट तथा क्रेडीट कार्डच्या माध्यमातूनच बँकिंग व्यवहार होणार आहे. दरम्यान, अनेक ग्राहकांचे नवीन कार्ड पत्ता बदलल्याने अथवा तांत्रिक अडचणींमुळे घरापर्यंत पोहचले नसले तरी असे कार्ड संबंधित ग्राहकांच्या शाखांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी नवीन डेबिट कार्ड बदलून घेण्यासाठी आपल्या स्थानिक बँकेच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन शाखा व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे.कार्ड न मिळाल्यास मुदत वाढविणारगेल्या दोन वर्षांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने मॅग्नेटिक स्ट्रिपचे डेबिट कार्ड बदलून त्याऐवजी ईव्हीएम चिपचे डेबिट कार्ड वितरित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील काही बँकांनी गेल्या वर्षीच या आदेशाची अंमलबजावणी केली होती. आता स्थानिक सहकारी बँकांसोबतच सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बँकांनीही अशाप्रकारे मॅग्नेटिक स्ट्रिपचे कार्ड ब्लॉक करून ईव्हीएम चिपचे कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, यापूर्वी ३० एप्रिलपर्यंत ग्राहकांना त्यांचे कार्ड बदलून घेण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक ग्राहकांना कार्ड न मिळाल्याने ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
३१ डिसेंबरनंतर मॅग्नेटिक स्ट्रीपचे डेबिट कार्ड होणार ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:18 AM