नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.गोदावरीच्या पुरामुळे जेलरोड, दसक येथे १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या संत जनार्दन स्वामी पुलावरून ३१ वर्षांत पहिल्यांदाच रविवारी दुपारी पुराचे पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. यामुळे नाशिकरोड जेलरोडवरून नांदूर नाका व औरंगाबाद महामार्गावर येणारी, जाणारी वाहतूक बंद झाली होती. यापूर्वी सप्टेंबर २००८ मध्ये पावसाच्या पुराचे पाणी फुलाच्या खालील बाजूस लागल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पहिल्यांदाच ३१ वर्षांत संत जनार्दन स्वामी पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी वाहून जात असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. महापुरामुळे दसक स्मशानभूमी शेड, नदीपात्रातील उभी मारुतीची मूर्ती पुराच्या पाण्याखाली गेली. याचबरोबर आगर टाकळी येथील नासर्डी-गोदावरी नदी संगम पूल व आगर टाकळी समर्थ रामदास स्वामी मठाजवळील नासर्डी नदीवरील पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेला होता. तसेच वालदेवी नदीला महापूर आल्याने देवळालीगाव-रोकडोबा वाडी पुलावरून विहितगावला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. याशिवाय नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी येथील ब्रिटिशकालीन दारणा नदी पुलाला पुराचे पाणी लागल्याने सकाळपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नवीन चौपदरी मार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. गोदावरी, वालदेवी, नासर्डी, नंदिनी, दारणा या नद्यांना महापूर आल्याने नाशिकरोड व परिसरातील गावांतील नदीकाठावरील स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड पुराच्या पाण्याखाली गेले होते. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गोदावरी, वालदेवी, दारणा आदी नद्या-नाल्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरजन्य परिस्थितीमुळे देवळालीगाव, वडारवाडी, साठेनगर, रोकडोबावाडी, जेलरोड, दसक व टाकळीगाव येथील आदिवासी वाडा येथील नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
३१ वर्षांनंतर जेलरोडचा पूल बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 1:10 AM
नाशिकरोड : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल ३१ वर्षांनंतर जेलरोड येथील संत जनार्दन स्वामी पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याचबरोबर दिवसभरच्या पावसामुळे नाशिकरोडला सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. वालदेवी नदी तसेच नासर्डीच्या पुरामुळे आगरटाकळी, विहितगावचा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. सायंकाळनंतर पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.
ठळक मुद्दे पोलिसांनी पुलाच्या दुतर्फा बॅरिकेड्स उभारून पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.