नाशिक : जीवाभावाच्या मित्राला भेटण्यासाठी एखाद्या व्यक्तीने विदेशातून कठीण प्रवास करणे स्वाभाविक ठरू शकते. मात्र, अमेरिकेतील एका श्वानाला नाशकातील त्याच्या मित्राने साद घातली आणि त्याच्या भेटीसाठी अमेरिका ते भारत असा तब्बल ७२ तासांचा विमान प्रवास करून हे श्वान अखेरीस नाशिकमध्ये दाखल झाले आणि भेटीनंतर दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एका युवा अभियंत्याची आणि त्याच्या श्वान मित्राची आगळीवेगळी घटना नुकतीच नाशिकमध्ये घडली. शिकागोपासून नाशिकपर्यंत प्रवास करणाऱ्या या श्वानाची ही घटना तशी दुर्मीळ आणि कुतहूल वाढवणारी तितकीच रंजक आहे. इंदिरानगर परिसरात राहणारा शौनक चांदवडकर हा २६ वर्षीय अभियंता अमेरिकेतील कोलंबस येथे उच्च शिक्षणासाठी गेला होता. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच घरात पाळीव प्राण्यांमध्ये मनापासून रमणारा शौनक तेथे गेल्यावरही एका लॅब्रोडर जातीच्या श्वानाच्या प्रेमात पडला. अवघ्या दोन महिन्यांच्या या पिलाला त्याने घरी आणले. त्याचे मोझी असे नामकरणही केले. मोझी आणि त्याची इतकी गट्टी जमली की, सुटीच्या दिवशी कारमध्ये बसवून फिरायला जाणे हे दोघांचेही आवडीचे बनले. एवढेच नव्हे मोझीचे दोन वाढदिवसही शौनकने थाटात साजरे केले.
दरम्यान, शौनकला भारतात परतावे लागले. आपल्या लाडक्या मित्राला तेथे ठेवून येणे शौनकला शक्य नव्हते. त्यामुळे शौनकने मोझीला भारतात कसे आणता येईल याची सर्व माहिती घेतली, कागदपत्रांची पूर्तता केली, त्याचे आवश्यक ते लसीकरण केले. त्याला अमेरिकेतील यूएसडीए तसेच भारतातील पशुसंवर्धन खात्याच्या अनेक तरतुदी पूर्ण कराव्या लागल्या. तब्बल दोन महिन्यांत मोझीला अमेरिकेच्या संबंधित मंत्रालयाने आखून दिलेल्या नियमानुसार मोझीच्या पाठीत चीप बसविणे आदी तरतुदी शौनकने पूर्ण केल्या. पेट रिलोकेशन संस्थेला त्याला भारतात पाठवण्याची जबाबदारी सोपवून शौनक मार्च महिन्यात मायदेशी परतला.
इन्फो...
असा झाला मोझीचा प्रवास...
रिलोकेशन करणाऱ्या कंपनीने मोझीसाठी खास त्याच्या आकारानुसार खास पिंजरा तयार केला होता. त्यात त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था, डायपर शौनकचा जुना शर्ट अशी व्यवस्था केली गेली. लुफ्तांसा एअरलाइन्सच्या विमानाने ५ जूनला शिकागोतून मोझीने उड्डाण केले. जर्मनीच्या फ्रॅन्कफर्ट विमानतळावर पंधरा तासांचा ले ओव्हर असताना तेथील कर्मचाऱ्यांनी मोझीची तपासणी केली आणि शौनकला तिथून त्याचे फोटो पाठवण्यात आले. तेथून मोझी निघाला आणि मुंबई विमानतळावर ७ जूनला रात्री साडेआठ वाजता उतरला. तेथे सगळ्या कायदेशीर पूर्तता करून जेव्हा एजन्सी प्रतिनिधीने मोझीला बाहेर आणले. त्याने शौनककडे आपला हात पुढे केला आणि दुसऱ्या क्षणी धाव घेऊन तो त्याच्या लाडक्या शौनकच्या कुशीत विसावला.
कोट.
मोझीचे स्थलांतर करण्यासाठी मी खूप आधीपासून तयारी सुरू केली. घरी आई, बाबा, आजी आणि भाऊ यांनीही मला प्रोत्साहन दिले. त्याला इकडे आणण्यासाठी खर्च खूप झाला; परंतु प्रेमाला मोल नसते हेच खरे. मोझीची भेट ही माझ्यासाठी आनंदाची घटना आहे.
- शौनक चांदवडकर, नाशिक
------
छायाचित्र आर फोटोवर १६ मोझी, १६ शौनक मोझी नावाने सेव्ह..