नाशिक महापालिकेत सध्या कोरोनाच्या नावाखाली भलतेच प्रकार सुरू झाल्याच्या तक्रारी देखील होऊ लागल्या आहेत. सध्या कोरोनाचे गंभीर संकट असल्याने लोकप्रतिनिधी तातडीच्या कोणत्याही खरेदी वा अन्य खर्चास अडकाठी करीत नाहीत. परंतु त्यातून आता भलतेच प्रकार घडू लागल्याची महापालिकेत चर्चा आहे. कोरोना बाधितांसाठी तयार केलेले कोविड सेंटर्स तसेच अन्य महापालिकेच्या कोविड रूग्णालयात सफाई कामगारांची संख्या अपुरी पडत असल्याचे निमित्त करून महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगारांच्या भरतीचा घाट घातला होता. सध्याच्या आऊटसोर्सिग ठेकेदाराकडूनच ३०० सफाई कामगार भरती करून घेण्याची तयारीही या अधिकाऱ्याने केली हेाती.
महापालिकेच्या वतीने सर्व वैद्यकीय पदे तीन महिन्यांंसाठी कंत्राटी पध्दतीने भरली जात असताना हीच पदे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याचा घाट घातला जात असल्याने पालिका वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी आऊट सोर्सिंगव्दारे भरती करण्याऐवजी मानधनावर भरती करण्याचे आदेश दिले असून त्यासंदर्भातील जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सोपवली आहे. त्यामुळे निविदा न काढता सफाई कामगारांची भरती करण्याचा प्रयत्न फसला आहे.