नाशिक : गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सची अतिक्रमित भिंत बांधण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडकाम दुरुस्त केले जाणार असले तरी त्यासाठी न्यायमूर्तींनी दिलेली सहा आठवड्याची मुदत संपुष्टात आल्याने त्यावर आता न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेची सुनावणी करताना नदीच्या पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. सदरची कार्यवाही नीरी या संस्थेच्या अहवालानंतर करण्यास महापालिकेला बजावले होते. यावर यापूर्वी कार्यवाही झाली नसली तरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात कार्यवाहीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कार्यवाही सुरू केली. माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीच्या ग्रीन फिल्ड या लॉन्सच्या बांधकामावर हातोडा चालविला होता. दरम्यान, महापालिकेने आगाऊ दिलेल्या नोटिसीमुळे मते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व त्यानुसार न्यायालयाने महापालिकेला या लॉन्सचे बांधकाम हटवू नये असे आदेश मे महिन्यात दिले होते. मात्र, तरीही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करून या लॉन्सची भिंत पाडल्याने त्याविरुद्ध लॉन्सचालकांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळेच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफीनामा सादर करावा लागला होता.उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांत पाडलेली भिंत पुन्हा बांधून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली. १९ लाख रुपयांच्या कामाच्या निविदा मागविल्या, प्रत्यक्षात १७ लाख रुपयांत काम होत असून, कार्यारंभ आदेश दिल्यानंतर आठ दिवसांपूर्वी कामकाज सुरू झाले आहे. तथापि, न्यायालयाने दिलेली मुदत टळूनही पूर्ण बांधकाम झाले नसल्याची चर्चा आहे.
अखेर ग्रीन फिल्डची भिंत बांधण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:41 AM