शालांत परीक्षेत सोनाक्षी शिंगाडे तालुक्यात प्रथमनांदगाव : येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी सोनाक्षी प्रकाश शिंगाडेच्या गुणांमध्ये क्रीडा गुणांची वाढ झाल्याने तिला ९८.६० टक्के गुण मिळून ती तालुक्यात बोर्डाच्या दहावी शालांत परीक्षेत प्रथम आली. यापूर्वी तालुक्यातून ९४.६० टक्के गुण मिळालेला विद्यार्थी प्रथम आल्याचे जाहीर झाले होते. सोनाक्षी अभ्यासात हुशार आहेच; पण किक बॉक्सिंग या प्रकारात राष्ट्रीय पातळीवर तिला रजतपदकही मिळाले होते. माझे हक्काचे क्रीडा गुण घेऊनच प्रवेश घेईन, असा आग्रह करणाऱ्या सोनाक्षीला जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी वेगवेगळी कारणे दाखवून गुण मिळवून देण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तिला हक्काचे गुण हवे होते. म्हणून आम्ही अन्यायाविरुद्ध किल्ला लढवला. असे जयश्री व सोनाक्षी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तेव्हा दोघींच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांचे हजारो रु.खर्च झाले ते केवळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे शिवाय सोनाक्षीचा तालुक्यातून प्रथम येण्याचा आनंद हिरावला गेला तो वेगळाच. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून बोर्डाला सोनाक्षीचे नाव कळविण्यात आले नव्हते. चूक झाल्याचे शिंगाडे यांनी लक्षात आणून दिल्यानंतरसुद्धा ती दुरुस्त करण्यासाठी केलेली दिरंगाई व सोनाक्षीच्या कुटुंबाला झालेल्या मानसिक त्रासाची व आर्थिक झळीची दखल जिल्हा क्रीडा अधिकारी घेतील, का हाच प्रश्न आहे. (वार्ताहर)
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या दुरुस्तीनंतर निकाल बदलला
By admin | Published: June 18, 2016 11:11 PM