नांदगांव : मागणीप्रमाणे रस्ता बनवून देण्यासाठी विहित नमुन्यात वहिवाट दावा दाखल करावा म्हणजे उचित कार्यवाही करता येईल असे लेखी आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर खादगाव ग्रामस्थांनी सुरु केलेलं आमरण उपोषण पहिल्या दिवशी सोडण्यात आले. खादगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२०० लोकसंख्या असलेल्या दलित वस्तीसाठी वारंवार मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ. बी. सी. सेलचे तालुकाध्यक्ष दिनकर यमगर (पहिलवान) व कमलाकर आहिरे, भारत आहिरे, विलास मोरे व इतर नागरिकानी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. रस्त्यावर खासगी अतिक्रमण असल्याचा दावा उपोषणार्थी यांनी केला होता. या दाव्याला आव्हान देतांना सागर वड्क्ते व इतर ११ यांनी मोजणी करून अतिक्रमण आहे, हे सिद्ध करून द्यावे असे नमूद केले. रस्ता हा आमच्या खासगी मिळकतीतून जातो. परंतु आम्ही कोणास अडवत नाही असेही वडक्ते व इतरांनी चौकशी दरम्यान नमूद केले असले तरी येथे पक्की सडक व्हावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.
आश्वासनानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 1:44 PM