मनमाड : शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे तालुका युवा अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित केले असून तीस दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.
मंगळवारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सर्वांसाठी घरे २०२२ या धर्तीवर नगर परिषदेच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टकार मोहल्ला या झोपडपट्टीचा मोजणी प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केलेला असून मोजणी फीचे चलन प्राप्त होताच फी भरून मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच समाजकल्याण विभागाकडे रमाई घरकूल योजनेचे प्रस्तावही सादर केले आहेत. आपल्या पत्रानुसार बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे, असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान, तीस दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पालिकेचे आणि भूमिलेख अधिकारी यांनी दिले असल्याने उपोषण तात्पुरते स्थगित केले असल्याची माहिती रिपाइंच्या वतीने दिली आहे. रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, पी.आर. निळे, तालुका अध्यक्ष कैलास अहिरे, ॲड. प्रमोद अहिरे आदी उपस्थित होते.