नाशिक : केंद्राच्या अर्थसंकल्पात इंधनावर कर लावण्यात आल्यामुळे पेट्राल आणि डिझेलची दरवाढ होणे निश्चित होताच दुपारनंतर शहरातील काही पेट्रोलपंपांवर जादा दराने पेट्रोल, डिझेलची विक्री करण्यात आल्याचा अनुभव अनेक वाहनधारकांना आला.एरव्ही अर्थसंकल्पात एखादी वस्तू स्वस्त झाली की लागलीच स्वस्त विकली जात नाही, मात्र काही ठिकाणी संंबंधित पेट्रोलपंपचालकांनी दरवाढीची दाखविलेली तत्परता चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरली.केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी इंधनवर कर आकारल्यामुळे साहजिकच इंधनाचे दरवाढ होणार आहे. मात्र ही दरवाढ कधी होणार याचा उल्लेख नसल्याने संभाव्य वाढ लक्षात घेऊन शहर परिसरातील काही पेट्रोलपंपचालकांनी डिझेल दोन रुपये ३० पैसे, तर पेट्रोल २ रुपये ५० पैसे वाढविल्याची तक्रार समोर आली. साधारणपणे दुपारी ३ वाजेनंतर अशा प्रकारची दरवाढ काही ठिकाणी करण्यात आली. याचा फटका काही वाहनधारकांना नक्कीच बसला.इंधनावर कर वाढविण्यात आल्यामुळे दरवाढ अटळ झाल्यामुळे सर्वत्र या वाढीविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने याबाबत आणखी काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीच या दरवाढीला विरोध दर्शविला आहे. या दरवाढीमुळे महागाईत भर पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मात्र शहरातील काही पेट्रालपंपचालकांनी वाढलेल्या कराची संधी साधून वाढीव दराने पेट्रोल, डिझेल विक्री केल्याचे समजते.यासंदर्भात काही नागरिकांनी दैनिकांच्या कार्यालयात दरवाढ लागू झाल्याबाबत खात्री करून घेतली, तर काहींनी तक्रारदेखील केली. पेट्रोपंप चालक कोणतीही सबब ऐकून घेत नसल्याचे अनुभवदेखील वाहनधारकांनी बोलून दाखविले. पेट्रोलदरवाढ झाली किंवा नाही याबाबतची स्पष्टता कुठून मिळेल याविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र पंपचालकांकडून वाहनधारकांचे समाधान होऊ शकले नाही.केंद्र शासनाकडून अनेक उद्योग व्यवसायांना कर्ज आणि सवलती दिल्या जात असताना पेट्रोल-डिझेलवर कर आकारण्यात आल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संकटात सापडला आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. शहरातील काही पंपचालकांनी आताच इंधन दरवाढ केली आहे. रोखीचे व्यवहार, अॅटो पार्ट, कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी वाढविण्यात आल्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय सर्वाधिक अडचणीत येऊ शकतो.- जयपाल शर्मा, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनअर्थसंकल्पात इंधनदरवाढ जाहीर होताच शहरात पेट्रोलपंपांवर दर वाढल्याचा अनुभव अनेकांना आला. तर दुपारनंतर इंधनावरील कराला स्थगिती मिळाल्याचीदेखील अफवा पसरली होती.
बजेटनंतर शहरातील पेट्रोलपंपांवर लागलीच इंधन दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:49 AM