नाशिक : तालुका पंचायत समितीअंतर्गत एका अधिकाऱ्याच्या कामकाजावरून नाराज असलेल्या गंगाम्हाळुंगी येथील शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने काल (दि.११) चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकविल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोहोचलेल्या सुखदेव बनकर यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आश्वासन आंदोलकांना दिल्याचे समजते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अपंगांच्या प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार अंपग संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालण्यात आला होता. आता आंदोलकांनी पुन्हा त्यांच्या खुर्चीलाच लक्ष्य करीत चक्क गांधीगिरी करून खुर्चीला निवेदन चिटकविल्याचे समजते. निलंबित कृषी अधिकारी पंचायत समितीतच ठाण मांडून असून, त्यांना अन्यत्र हलविण्यात यावे. तसेच विशेष घटक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरींचे व बैलजोडीचे अनुदान मंजूर झाले असून, तेही मिळत नसल्याने पंचायत समितीत वारंवार चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांना तत्काळ मंजूर अनुदानाचे धनादेश देण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी करीत निवेदन सुखदेव बनकर यांच्या खुर्चीला चिटकविले. यावेळी सुखदेव बनकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला पंचायत समितीत कामकाज करू दिले जाणार नाही, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. तसेच अशाप्रकारे आंदोलन केल्याने उपसभापती अनिल ढिकले यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब लांबे, कैलास खांडबहाले, विलास सांडखोरे, रोहन थेटे, देवीदास फसाळे, संदीप खांडबहाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हार घातल्यानंतर आता चक्क चिकटवले निवेदन सीईओंची खुर्ची झाली आंदोलकांचे ‘लक्ष्य’
By admin | Published: February 11, 2015 12:42 AM