नाशिक : २००३ च्या सिंहस्थातील दुसऱ्या पर्वणीत काढण्यात आलेल्या शाही मिरवणुकीत साधू-महंतांनी चांदीची नाणी उधळल्याने चेंगराचेंगरी होऊन त्यात २९ भाविकांचा मृत्यू, तर ११८ भाविक जखमी झाले होते़ या घटनेस कारणीभूत असलेल्या चार साधू-महंतांची जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी (दि़ ३) निर्दोष मुक्तता केली़ या खटल्याच्या निकालास एक तपाहून अधिक कालावधी लागला़ नाशिकमध्ये २००३-२००४ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसरी शाही पर्वणी २७ आॅगस्ट २००३ रोजी होती़ मालवीय चौकाकडून येणारा मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला होता़ यावेळी वृंदावन, मथुरा येथील स्वामी ग्यानप्रकाश महाराज, स्वामी मुकेशरदास महाराज व अन्य दोन साधू हत्ती व वाहनांमधून तपोवनातील साधुग्रामकडे जात होते़ त्यांनी भाविकांच्या दिशेने प्रसाद म्हणून चांदीची नाणी, मनुके, चॉकलेट, फुले आदि वस्तू फेकल्याने त्या घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती़ नेमकी त्याचवेळी राममंदिराकडून येणाऱ्या भाविकांमुळे चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये २९ भाविक ठार झाले, तर ११८ भाविक जखमी झाले होते़ पोलिसांनी या चौघा साधूंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही पाठविले होते़ या खटल्याचा निकाल न्यायदंडाधिकारी एस़ आऱ भोर यांनी गुरुवारी (दि़ ३) दिला आहे.
तपानंतर चेंगराचेंगरी खटल्यातंील साधू निर्दोष
By admin | Published: March 05, 2016 10:01 PM