नाशिक : राज्यात सध्या सुरू असलेली २०१६-१७ ची संचमान्यता तथा शिक्षण समायोजन प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त राहणाऱ्या पदांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी परवानगी देण्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. नाशिकमधील दंत महाविद्यालयात सोमवारी (दि. १६) दुपारी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या समजावून घेतल्या. तसेच विविध शिक्षण संस्थाचालकांचीही त्यांनी यावेळी बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अपूर्व हिरे, माजीमंत्री प्रशांत हिरे, भाजपाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक व संस्थाचालकांच्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमोर नवीन शिक्षक भरतीची मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली. त्यावर तावडे यांनी चिपळूणकर समिती आणि शासनाचा शिक्षक व शिककेतर भरतीप्रक्रियेसंबंधी नियमावलीतून सुवर्णमध्य काढून रिक्त जागांवर भरतीची मान्यता दिली जाऊ शकते, असे संकेत देतानाच संस्थाचालकांना ही पदे मनमानी पद्धतीने भरता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. शासनस्तरावर झालेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमधूनच संस्थांना शिक्षकांची भरती करता येणार असल्याचे सांगितले. तसेच गंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांच्या भरतीवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात पदवीधर मतदार संघ निवडणुकीसह जिल्हा परिषद तथा मनपा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याचे सांगत बहुतेक प्रश्न व समस्यांवर ‘बघू, करू’ अशी आश्वासने तावडे यांनी दिली. ‘बरे बोलू की खरे बोलू’ मुख्याध्यापक व संस्थाचालकांसोबत झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी विविध निर्णय योग्यरीतीने शालेय संस्था तसेच शाळांपर्यंत पोहोचवला नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, तर संस्थाचालकांनीच अधिक ाऱ्यांना अनावश्यक सवयी लावल्याचे सांगत संस्थाचालकांनाही खडे बोल सुनावले. विविध गैरप्रकारांना हद्दपार करून यातून होणाऱ्या बचतीतून आयटी, संस्थांचे लाइट, घरभाडे, कला, संगीत, क्रीडाशिक्षण खर्चात वाढ करणे शक्य असल्याचे तावडे यांनी सांगितले. परंतु केवळ समाधान व्हावे म्हणून वेगवेगळी आश्वासनांनी दिशाभूल करणे योग्य नसल्याचे सांगताना ‘बरे बोलू की, खरे बोलू’ अशी उक्ती वापरून संस्थाचालक, मुख्याध्यापकांची विश्वासार्हता मिळविण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक आचारसंहितेनंतर शिक्षण क्षेत्रात भरती : तावडे
By admin | Published: January 17, 2017 12:05 AM