नाशिक : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटा पत्ता व चुकीचे अंतर नमूद केली होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर पहिल्या यादीत निवड झालेल्या अर्जांवर निवड न झालेल्या पालकांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी गुरुगोविंदसिंग शाळेतील पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीने दोन दिवसांपूर्वी नाकारलेला अर्ज पुन्हा वैध ठरविल्याचा आरोप महापालिक ा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांनी प्रवेश अर्जात खोटे पत्ते तसेच खोटे अंतर नमूद केल्याचे निदर्शनास आले आहे. विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घराचे प्रत्यक्षातील अंतर आणि अर्जावरील अंतर यात फरक दिसून आला आहे. पहिल्या सोडतीतून वंचित राहिलेल्या पालकांनी हा मुद्दा उपस्थित करत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर देवरे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. त्यानंतर बाद करण्यात आलेला अर्ज मंगळवारी (दि. १६) रोजी पडताळणी समितीने पुन्हा वैध ठरविल्याने काही पालकांनी याप्रक्रियेविषयी शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी तक्रार निवारण समितीने कार्यवाही करावी, यासाठी प्रशानाधिकारी उदय देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, आरटीई अंतर्गत नाशिक शहरातील ९२ शाळांमध्ये पहिलीसाठी एक हजार ८२१, तर नर्सरीसाठी दोन शाळांमध्ये ३९ जागा आहेत. त्यापैकी पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज पडताळणीसाठी शहरात के. एन. केला शाळा, गुरुगोविंद सिंग शाळा, होरायझन अकॅडमी, सरस्वतीनगर येथील के. के. वाघ शाळा असे चार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.मंगळवारी १५८ प्रवेशआरटीई प्रवेशप्रक्रियेत पालकांकडून आक्षेप घेतले जात असताना दुसरीकडे प्रवेशप्रक्रिया सुरू असून, मंगळवारी शहरातील विविध शाळांमध्ये सुमारे १५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे, तर शहरातील ९२ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या एक हजार ८६० जागांपैकी आतापर्यंत ५२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
अंतराच्या मुद्द्यावरून बाद अर्ज दोन दिवसांनी वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:30 AM