नाशिक : येत्या २८ मार्चला गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावास्या असल्याने गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, गुढी कधी उभारायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी २८ मार्चलाच गुढीपाडवा साजरा करण्याचा खुलासा केला असून, गुढी मात्र सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनंतर अमावास्या समाप्तीनंतर उभारण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. यंदा दि. २७ मार्च रोजी दर्श सोमवती अमावास्येस सकाळी १०.४४ वाजता प्रारंभ होऊन दि. २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ वाजता अमावास्या समाप्ती होते. सर्वसाधारणपणे हिंदू पंचागानुसार सूर्याने पाहिलेली तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. मात्र, दाते पंचांगकर्त्यांनी याबाबत स्पष्ट खुलासा करत दि. २८ मार्चलाच गुढीपाडवा साजरा करावा, असे म्हटले आहे. दाते पंचागानुसार, शके १९३९ या नूतन संवत्सराच्या पहिल्या दिवशी २८ मार्च रोजी मंगळवारी सूर्योदयानंतर सकाळी ८.२७ पर्यंत अमावास्या असून, प्रतिपदा क्षयतिथी आहे. प्रतिपदेची समाप्ती बुधवारच्या सूर्योदयापूर्वी पहाटे ५.४५ वाजता आहे. प्रतिपदेचा क्षय असल्याने मंगळवारी सकाळी ८.२७ नंतर म्हणजेच अमावास्या समाप्तीनंतर नूतन संवत्सरारंभ होईल. त्यामुळे दि. २८ मार्च रोजी सकाळी ८.२७ नंतर नेहमीप्रमाणे गुढी उभी करून गुढीपूजन व श्री गणपतीपूजन करावे. मात्र, सकाळी ८.२७ पूर्वी स्नान करून संध्या व देवपूजा करता येईल, असेही पंचागात स्पष्ट करण्यात आले आहे. सूर्यसिद्धांतीय गणित पद्धतीनुसार २८ मार्च रोजी प्रतिपदा तिथीचा क्षय होत नसल्याने उत्तरेकडील काशी आदि प्रदेशातील पंचांगात २९ मार्च रोजी गुढीपाडवा दिलेला आहे. गणित पद्धतीतील भिन्नतेमुळे भारतामध्ये नूतन संवत्सराचे दोन दिवस असणार आहेत. मराठी माणसाचे पंचांग हे दृक्प्रत्ययी गणित पद्धतीचे असल्याने २८ मार्च रोजीच गुढीपाडवा साजरा करण्यात यावा. महाराष्ट्र, गुजरातसह भारतातील सर्व दृक्प्रत्ययी पंचांगांमध्ये व भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगातदेखील गुढीपाडवा २८ मार्च रोजीच आहे.
...पण गुढी उभारा अमावास्या समाप्तीनंतर
By admin | Published: March 25, 2017 12:33 AM