लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ३ आगस्ट रोजी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या व गेल्या पंधरा दिवसांपासून गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी पंचक्रोशीतील पूरबाधितांची मिळेल त्याठिकाणी सेवा करणाऱ्या चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अखेर आपली सेवा पूर्ववत सुरू करण्यात यश मिळाले आहे. सोमवारपासून चांदोरी आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण तपासणी सुरू करण्यात आली असली तरी पुरामुळे आरोग्य केंद्राचे झालेले नुकसान पाहता, आणखी सहा महिने तरी नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा चांदोरी केंद्रात मिळण्यास कालावधी लागणार आहे.
सलगच्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरणातून ३ आॅगस्ट रोजी गोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. पुराच्या पाण्याने आरोग्य केंद्राला वेढा बसणार असल्याचे पाहून दुपारपासूनच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनी आरोग्य केंद्रातील वस्तू, दप्तर, साहित्य सुरक्षितस्थळी नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तर दुपारनंतर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना घरी पाठवून देण्यात आले. हा हा म्हणता रात्री गोदावरीच्या पुराने संपूर्ण आरोग्य केंद्र कवेत घेतले. त्यामुळे पूरबाधितांच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांना चांदोरीच्या शेतकरी हॉटेलचा आश्रय घ्यावा लागला. सलग तीन दिवस पाण्याखाली असलेल्या आरोग्य केंद्राचे पुराचे पाणी ओसरले असले तरी गाळ, चिखल, पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा, मेलेल्या जनावरांमुळे आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून आरोग्य केंद्राच्या अधिकारी, कर्मचा-यांनी स्वच्छतेला प्रारंभ केला. आठ दिवसांच्या स्वच्छतेनंतर सोमवारी आरोग्य केंद्र सुरू होऊ शकले आहे. सोमवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सवाई यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय सेवेला प्रारंभ करण्यात आला. मात्र बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचार केल्याशिवाय अन्य आरोग्य सेवा पुरविण्यात अजूनही अडचणी कायम आहेत.