नाशिक : श्री गणरायांची गणेश चतुर्थीला विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तीची ज्याठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते तेथून ती हलविणे म्हणजे मूर्तीचे पावित्र्य भंग झाल्याचे धर्मशास्त्रात मानले जाते, मात्र नाशकातील मौल्यवान व किमती गणरायांना चोरांच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणाहून दररोज सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात चक्क रात्रीच्या वेळी कार्यकर्त्याच्या घरात मुक्काम करावा लागतो. कोणत्याच गणेशभक्तांना न आवडणारा हा निर्णय हिरावाडीतील नवजीवन कला-क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळातील कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून घ्यावा लागला आहे. त्यामागचे कारण म्हणजे पोलिसांनी मौल्यवान गणरायांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास सपशेल नकार दिला आहे.सालाबादाप्रमाणे यंदाही नाशकात गणेशोत्सवाची धूम असून, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांमध्ये ५६८ लहान व १९१ मोठे मंडळे सहभागी झाले आहेत. दरवर्षाप्रमाणे यावेळीही ३९ मौल्यवान व किमती गणरायांची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यात बºयाचशा मंडळांनी मौल्यवान गणरायांच्या दागिन्यांमध्ये मोठी भर घालून त्यांचे मोल आणखीच वाढविले आहे. रविवार कारंजा येथील चांदीचे घडविलेले सिद्धिविनायक वगळता उर्वरित मौल्यवान गणरायांचे फक्त गणेशोत्सवाच्या काळातच आगमन होते. गणेशभक्तांसाठी या मौल्यवान गणरायांचे जसे आकर्षण असते तितकीच मूर्तीची काळजी संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही घ्यावी लागते. दिवसा व रात्री त्यांना मंडळात जागता पहारा द्यावा लागतो, त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येते. शहरात उत्सवाच्या काळात पोलिसांचा जागता पहारा असतानाही चोºया, घरफोड्यांचे प्रमाण कायम असून, दिवसा व सायंकाळी घराबाहेर पडणाºया महिलांचे सौभाग्याचे लेणं सुखरूप राहिलेले नाही, अशा परिस्थितीत सार्वजनिक चौकात प्रतिष्ठापना केलेल्या मौल्यवान व किमती गणरायांची चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस खात्याची असताना त्यांनी मात्र ही जबाबदारी टाळण्याची सपशेल भूमिका घेत एक प्रकारे चोरांपुढे नांगी टाकल्याचे वर्तन केले आहे. शहरातील सर्वच गणेश मंडळांना बंदोबस्त देण्यात आल्याचा दावा पोलीस यंत्रणेकडून केला जात असताना प्रत्यक्षात त्याचे वास्तव काही वेगळेच आहे. देव-देवताही नाशिक शहरात चोरांपासून सुरक्षित राहू शकत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असू शकते?
चार तासांनंतर दर्शन दुर्लभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:33 AM