लोकमत’चा दणका : गरिबांची दिवाळी गोड
नाशिक : ऐन सणासुदीत वाहतूक ठेकेदाराने साखरेची वाहतूक न केल्यामुळे रेशन दुकानांवर खडखडाट झाल्याने दुकानदार तसेच गोरगरिबांकडून होणारी ओरड लक्षात घेऊन नरक चतुर्दशीच्या दिवशी वाहतूक ठेकेदाराने धावपळ करीत शहरातील दुकानदारांपर्यंत साखर पोहोचती केली. त्यामुळे आता ऐन दिवाळीत दुकानदारांना साखर विक्रीसाठी दुकाने उघडावी लागली आहेत.सरकारने रेशनवरील धान्य व साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केलेली असताना वाहतूक ठेकेदाराने दिवाळीसाठी सरकारने दिलेली साखर पुरविली नसल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पुरवठा खात्याने ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्याने दोन दिवसात शहरातील २०६ दुकानांना साखरेचा पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला. नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना करण्यात आली होती. त्यातील सप्टेंबर महिन्यात ठेकेदाराने प्रत्येक रेशन दुकानापर्यंत साखर वाहतूक करून पुरविली असली तरी, आॅक्टोबर महिन्यात मात्र दुकानदारांना साखरेचा पुरवठा केला नाही. वर्षातून एकदाच येणारा दिवाळी सण सुरू होऊनही रेशनवर साखर मिळण्याच्या अपेक्षेवर असलेल्या गोरगरिबांना खुल्या बाजारात ४० रुपये किलो दराने साखर खरेदी करावी लागली. ४ किलो ते ४० किलो साखरसरकारने फक्त अंत्योदय योजनेसाठी पात्र ठरणाºया शिधापत्रिकाधारकांनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुकानदारांना चार किलो ते चाळीस किलोपर्यंत साखरेचे वितरण करण्यात आले.