मुकुंद बाविस्कर नाशिकथोर समाजसुधारक, बहुआयामी लेखक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी ३१ कादंबऱ्या, २२ कथासंग्रह, १६ लोकनाट्य व नाटके आदिंसह विपूल लेखन करीत मराठी वाङ्मयाच्या अनमोल खजिन्यात मोलाची भर टाकली आहे. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला वाचकांकडून अर्धशतकानंतरही मोठा प्रतिसाद मिळतो. परंतु नव समाजाने त्यांच्या समाजकार्याची फारशी दखल घेतली नाही किंबहुना अन्य समाजसुधारकांच्या तुलनेत त्यांची उपेक्षाच केली, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले अण्णा भाऊ साठे यांचे कुठलेही औपचारिक शिक्षण झालेले नसताना मराठी साहित्याच्या इतिहास एक प्रख्यात लेखक झाले. अण्णा भाऊ यांचे लेखन दलित लेखकांच्या पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे ठरले. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातील महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे पहिले प्रमुख इतिवृत्तकारही मानले जातात. अण्णा भाऊ यांनी कादंबरी, कथासंग्रह, लोकनाट्य, नाटके, पद्य, प्रवासवर्णन अशी ७२ पुस्तके लिहिली. अण्णा भाऊंनी ज्या कालखंडात कादंबरी लेखनास सुरुवात केली. त्या कालखंडावर प्रख्यात कादंबरीकार ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांचा प्रभाव होता, परंतु त्या काळात नागरी जीवनाचे चित्रण त्या काळातील कादंबऱ्यात होते. अण्णा भाऊ यांनी सर्व प्रथम आपल्या लेखनात ग्रामीण, दीनदलित, शोषित आदि स्तरातील लोकांच्या जीवनाचे चित्रण केले. त्यानंतरही परंपरा मराठी साहित्यात सुरू झाली. अण्णा भाऊ यांनी १९५९ मध्ये लिहलेली फकिरा ही कादंबरी खूपच गाजली. आजच्या काळातही वाचक या कादंबरीच्या वाचनाला प्रथम पसंती देतात, असे वाचनालयातील नोंदीवरून दिसून येते.
अर्धशतकानंतरही ‘फकिरा’चे वाचकांवर गारुड
By admin | Published: August 01, 2016 1:12 AM