नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या 2017-18 च्या मंजूर पीआयपीनुसार नाशिक जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल झाल्यानंतर ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांत भरावयाच्या 50 पदांसाठी 7 डिसेंबरला ही मुलाखत प्रक्रिया घेण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी भरतीप्रक्रियेत बदल झाल्यामुळे वैद्यकीय अधिराऱ्यांच्या भरतीच्या माध्यमातून अपहार करून लाखो रुपये उकळण्याची आस लावून बसलेल्या यंत्रणेतील भूजंगांचे मनसुबे उधळले गेले आहे. त्यामुळे मुलाखत प्रक्रियेतून 7 डिसेंबरलाच भरती उरकण्याची घाई लागलेल्या यंत्रणोने गुणवत्तेनुसार भरतीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर आठवडा उलटूनही अद्याप गुणवत्तेनुसार कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पुढील कार्यवाही होऊ शकलेली नाही.भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाराष्ट्र संचालक तथा आरोग्य आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर उपलब्ध अर्जापैकी गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची यादी तयार करून त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जवळपास आठवडाभराची सुट्टी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे उमेदवारांच्या कागदपत्रंची पडताळणी तरून भरतीसाठी गुणवत्ता अंतीम झाली नसल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळे पुढील भरतीची प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. जिल्ह्यातील मालेगाव- 30, बागलाण- 10, देवळा- 5 व चांदवड- 5 अशी पन्नास पदे भरावयाची आहेत. या पदांच्या भरतीसाठी सुमारे साडेसातशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. परंतु, यातील केवळ 150 उमेदवारांची निवड करून त्यांची अंतिम निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मुलाखतीसाठी 30 गुणांपैकी अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची थेट अंतिम निवड करण्यात येणार असल्याने ही भरतीप्रक्रिया वादात अडकली होती. तसेच भरतीप्रक्रियेत लाखो रुपयांचा गैरव्यहार होत असल्याच्या निनावी तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाची दखल थेट राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी घेतली असून, ऐनवेळी भरतीप्रक्रियेत बदल करण्याचे आदेश दिले असून भरतीप्रक्रियेतील बदलांनुसार उमेदवाराची शैक्षणिक पदवी, पदव्युत्तर पदवी व अनुभव यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बीएएमएस पदवीतील सरासरी गुणांना 80 टक्क्यांच्या प्रमाणात ग्राह्य धरून पदव्युत्तर पदवी, 10 टक्के व अनुभवास 10 टक्के असे एकूण 100 गुणांपैकी गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश आरोग्यसेवा आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या भरतीत कोणतीही मुलाखत प्रक्रिया न घेता गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना नियुक्तीचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही आरोग्यसेवा आयुक्तांनी केल्या आहेत.
मुलाखती वगळल्यानंतर कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 1:19 PM
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल झाल्यानंतर ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे.
ठळक मुद्देकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया लांबणीवरआरोग्य आयुक्तांच्या सुचनेनुसार भरती प्रक्रियेत बदलमुलाखत वगळून गुणवत्तेनुसार होणार निवडनाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांत 50 पदांसाठी भरती