Shiv Sena Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नागरीकांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आभार दौरा आता नाशिकमध्ये असून आज सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. या निमित्ताने शिंदे सेनेकडून जोरदार तयारी सुरू शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून सर्व प्रथम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण दुपारी दोन वाजता त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे हे महापालिका तसेच एनएमआरडीए यांच्यासह अन्य यंत्रणांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे.
नाशिकमध्ये लोकसभा निवडणूकीत शिंदे सेनेला अपयश आले असले तरी विधानसभा निवडणूकीत महायुतीला यश मिळाले. जिल्ह्यात शिंदे सेनेचे दोनच आमदार निवडून आले असले तरी पक्षाचे संघटन वाढत असून आत्तापर्यंत वेगवेगळ्या पक्षातील सुमारे २५ माजी नगरसेवक दाखल झाले आहेत. आणखी काही पदाधिकारी आणि ज्येष्ठ नगरसेवक देखील शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातील काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत होण्याची शक्यता आहे.