सिडको : महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी आमदार सीमा हिरे व आमदार अपूर्व हिरे यांनी दर्शविली आहे. सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून पालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली असून, रहिवासी भागातील अतिक्रमणेही काढण्यासाठी मनपाच्या वतीने डिमार्केशन करण्यात येत आहे. १ जूननंतर कधीही रहिवासी भागातील अतिक्रमणांवर हतोडा पडणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आल्याने सिडकोवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. अखेर जनक्षोभ पाहून आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. अपूर्व हिरे यांना रस्त्यावर उतरावे लागले. दोन्हीआमदारांनी डिमार्केशन केलेल्या भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार हिरे यांनी सांगितले की, महापालिका आयुक्तांकडून या बांधकामास अनधिकृत ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अतिक्रमणाला स्थगिती देण्याचे अधिकार हे महापौरांना असून, त्यांनी त्याबाबत दखल घ्यावी. महापालिकेच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहेत. अतिक्रमणविरोधात लढा देण्यासाठी अतिक्रमण बचाव कृती समितीची स्थापना करणार असल्याची माहिती आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्र्यांना घालणार साकडेअतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आमदार सीमा हिरे यांनीदेखील रायगड चौक, तानाजी चौक परिसरात नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मनपाने या घरांवर वरवंटा फिरवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन सिडकोवासीयांच्या भावना त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.
जनक्षोभानंतर आमदारद्वयी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:51 AM