नाशिक (सुयोग जोशी) : नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक बसेस तब्बल नऊ दिवसांनंतर शनिवारपासून (दि. २३) पुन्हा एकदा रस्त्यांवर धावणार आहे. वेतन अदा करूनही वेतनासाठी संप कायम ठेवणाऱ्या वाहकांची अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, सिटीलिंक महाव्यवस्थापक बाजीराव माळी व मिलिंद बंड यांच्याशी शुक्रवारी मनपा मुख्यालयात सुमारे चार तास सकारात्मक चर्चा झाली.
हा संप मिटल्याने शुक्रवारी सायंकाळपासूनच बससेवा सुरू झाली असली तरी शनिवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर दिसतील. संप काळात सिटीलिंकच्या १८०० फेऱ्या रद्द झाल्याने मनपाला एक कोटी रुपयांचा फटका बसला. पंचवटीतील तपोवन डेपो येथील बसेसना वाहक पुरविण्याचा ठेका मे. मॅक्स डिटेक्टिवव्ह अँड सिक्युरिटी या कंपनीला देण्यात आलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या कंपनीच्या वाहकांनी गुरुवार, दिनांक १४ मार्च २०२४ पासून संप पुकारला होता. नियमित वेतन, पीएफ, ईएसआयसी व रजेचे पैसे अकाऊंटला जमा करणे, इंक्रिमेंट, बोनस अशा मागण्यांचा समावेश होता.
शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर उर्वरित ज्या मागण्या तत्काळ पूर्ण करणे शक्य नाही. अशा मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिल्याने अखेर हा संप मागे घेण्याचा निर्णय वाहकांनी घेतला आहे.