नाशिक : शिवसेनेतील फुटीनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या ताब्यावरून ठाकरे गट व शिंदे गटात सुरू झालेली न्यायालयीन लढाई काही अंशी संपुष्टात आल्यानंतर बुधवारी (दि.१३) तब्बल नऊ महिन्यानंतर कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेतील कार्यालयाचा ताबा घेतला. कार्यालयाला पोलिसांनी सील ठोकले असल्याने ते काढण्यासाठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चार तास मात्र ताटकळावे लागले.
सायंकाळी उशीरा सील काढल्यानंतर कार्यालय मोकळे करून देण्यात आले. शिवसेना संचलित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेवर नेहमीच बबनराव घोलप यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्याच पुढाकाराने या सेनेची स्थापना झाली होती. तेव्हापासून मान्यताप्राप्त संघटना म्हणून म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कामकाज चालू असतांना शिवसेनेतील बंडखोरीची झळ या संघटनेलाही बसली.
संघटनेच्या सर्वसाधारण बैठकीत २७ सप्टेंबर २०२२ रोजी अध्यक्ष म्हणून ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर यांची निवड करण्यात आली होती व त्यांनी कार्यालयाचा ताबाही घेतला होता. परंतु शिंदे गटाने कर्मचारी सेनेवर दावा करीत प्रवीण तिदमे यांची अध्यक्षपदी निवड केली व म्युनिसिपल कर्मचारी संघटनेच्या महापालिकेतील कार्यालय ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता.