लोहोणेर : आज ना उद्या भाव वाढतील या अपेक्षेने सुमारे वर्षभर चाळीत जीव लावून सांभाळलेला कांदा आयुष्यमान संपल्याने खराब होवू लागला आहे. त्यामुळे अखेर तो उकिरड्यावर फेकण्याची पाळी बळीराजावर आली आहे.कांदयाचे आयुष्यमान संपल्याने तो सडतो आहे आणि हाच सडलेला कांदा शेतकरी उकिरड्यावर अथवा नदी पात्रात किंवा जिथे मोकळीक मिळेल अशा जागेवर सध्या फेकला जात आहे. या बेवारस पडलेल्या कांद्यावर चतुस्पद प्राणी आपला ताव मारताना दिसत आहेत. काही ठिकाणी हा सडलेला कांदा मेंढ्या - बकऱ्यांना दिला जात असून, काही ठिकाणी बैलांना चाºया बरोबर दिला जात आहे. यावर्षी कांद्याने बळीराजाची झोप उडवली. कांदा मार्केटमध्ये नेऊन विकला तर मातीमोल भावाने जातो. उत्पादन खर्च ही निघत नाही. अशा परिस्थितीत जरी कांदा विकायचा ठरवला तरी ट्रॉली भरण्यासाठी मजुरी, ट्रॅक्टर भाडे आणि कांदा विकून हातात येतात फक्त दोन - चारशे रु पये. म्हणून कमी मिळत असल्याने त्याला नंतर चांगला भाव येईल या अपेक्षेने शेतकरी कांदा चाळीत सांभाळून होते.मात्र गेल्या मार्च - फेब्रुवारी महिन्यात अथवा त्या आधी काढलेला कांदा आता सुमारे बारा महिनेचा होत आहे . सात ते आठ महिने टिकणारा कांदा आता आयुष्यमान संपल्यावर पाणी सोडतो आहे. तर काही ठिकाणी कांद्याला कोंब फुटले आहेत. अशा परिस्थितीत जर कांदा मार्केट मध्ये नेऊन विकला तर त्याला निश्चित मातीमोल भाव मिळेल हे बळीराजाला माहिती म्हणून त्याने या कांद्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता तो चाळी बाहेर काढण्याचे ठरविले आहे. मग तो उकिरड्यावर फेकणे असो किंवा जनावरांना खाऊ घालण्या शेतकरी तयार झाला आहे. भले तो सडलेला का असेना त्यासाठी ज्यादा मजुरी देऊन तो एकदाचा चाळीच्या बाहेर काढा हेच चित्र मात्र सद्या तरी सर्वत्र दिसत आहे. कारण कसमादेच्या कोणत्याही रस्त्याच्या कडेला कांदा फेकलेला दिसते आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा सडलेल्या कांद्याची दुर्गंधी या मार्गावरून चाताना अनुभवास येत आहे. त्यामुळेच कांदा बाहेर फेकण्याचा धडाका शेतकºयांनी सुरू केल्याचे चित्र सद्या सर्वत्र दिसत आहे.(०६ लोहोणेर,०६ लोहोणेर १)