नाशिक : देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पाँडेचेरी या पाच राज्यांमधील निवडणूक संपताच इंधन दरवाढीचा उडालेला भडका अध्याप शमलेला नाही. गत दीड ते दोन महिन्यांच्या कालावधील पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना सामान्य ग्राहकांना दरवाढीचा झटका देत पेट्रोल डिझेलच्या दरात तब्ब्ल 8 रुपयांनी वाढ केली असून, रविवारी नाशिक शहरात पेट्रोल १०५ रुपये तर डिझेल ९५. ३५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळांनी होरपळून निघत आहे.
देशात गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी होती. या कालावधीत पेट्रोल, डिझेलच्या किमतीत जवळपास दोन महिने कोणतीही वाढ झाली नाही. त्यापूर्वी २७ फेब्रुवारीला पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली होती. त्यानंतर काही पैशांची घसरण झाल्यानंतर दोन महिन्यांनी 4 मेपासून पुन्हा सुरू झालेली दरवाढ अजूनही कायम आहे. त्यामुळे सरकारकडून पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलच्या भावात होणारी घसरण अथवा भाव स्थिरावणे आणि निवडणुकांनंतर पुन्हा होणारी भाववाढ याचा सामान्य ग्राहकांकडून संबंध जोडला जात आहे. सरकार अप्रत्यक्षरीत्या तेल कंपन्यांवर दबाव निर्माण करून इंधनाचे भाव नियंत्रित करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत असल्याचा आरोप आता पेट्रोल, डिझेलच्या ग्राहकांकडून केला जाऊ लागला आहे. दरम्यान, नाशिक शहरात रविवारी पेट्रोल ३२ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी वाढले असून, ४ मेपासून इंधनाच्या किमतीत ३१ व्या वेळी ही भाववाढ झाली आहे. यात पेट्रोल व डिझेल जवळपास प्रतिलिटर ८ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर ऐतिहासिक उंचीवर पोहोचले आहेत.
कोट-
पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरूनही ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नाही. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर भाववाढ थांबविली जाते अथवा तेलाच्या किमती कमी केल्या जातात, त्यामुळे इंधन तेलाचे दर निश्चित करणाऱ्या यंत्रणांवर सरकारचा दबाव असल्याची साशंकता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
- किरण जाधव, ग्राहक
---
अशी झाली इंधन दरवाढ
महिना - पेट्रोल - डिझेल -
१ नोव्हेंबर - ८८.२१- ७६.१६
१ डिसेंबर - ८९.४४ - ७८.२०
१ जानेवारी - ९०.७६ - ७९.७१
१८ जानेवारी ९२.०२ - ८१.०८
१ फेब्रुवारी - ९३.२८ - ८२.४५
१७ फेब्रुवारी - ९६.६८ -८६.३४-
३० मार्च - ९७.३४ - ८६.९६
१५ एप्रिल - ९७.१८ - ८६.८२
४ मे - ९७.४२ - ८७.१०
३१ मे- १००.९५- ९१.४९
१जून- १०१.२० -९१.७३
२७ जून -१०५.०० -९५.३७