नाशिक : मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा राज्यव्यापी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी, नाशकात झालेल्या बैठकीत मात्र संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संपाचे नेतृत्व पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे स्पष्ट झाले आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील नैताळे येथे शेतकऱ्यांनी बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला लक्ष्य केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. तर दुसरीकडे प्रशासनाने या संपाला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्तात शेतमालाचे १९८ मालट्रक बाहेरगावी रवाना केल्याचा दावा केला आहे.
शेतकरी संपाची धग जिल्ह्णात तिसऱ्या दिवशीही कायम असून, नाशिक बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संप माघारीच्या निर्णयास विरोध करून संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठोस आश्वासन न घेता संप माघारीचा निर्णय घेणारे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला गेलेले शेतकरी नेते जयराज सूर्यवंशी यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. यावेळी संप मागे घेण्यासाठी शिष्टाई करण्यास गेलेले भाजपाचे स्थानिक खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी कोणतीही चर्चा न करता त्यांना माघारी फिरण्यास भाग पाडले. शनिवारी दुपारी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील नैताळे शिवारात बटाटे वाहून नेणाऱ्या वाहनाला संपकऱ्यांनी अडवून त्यातील बटाटे रस्त्यावर फेकल्याने संघर्ष निर्माण झाला. पोलिसांनी संपकऱ्यांना पिटाळून लावण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली व काही वेळानंतर पोलीस मारहाणीचा निषेध करीत गावकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शेतकरी संघटनेची जेथे स्थापना झाली त्या निफाड तालुक्यातील रूई येथे राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्णात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिला रस्त्यावर उतरल्या असून, नाशिक-गुजरात महामार्ग रोखून धरला. येवला तालुक्यातील भारम येथेही रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला, तर अनेक गावांमध्ये बंदसदृश परिस्थिती कायम आहे.