नाशिक- शहरातील नेहरु उद्यानाजवळ पाणीपुरी, चायनीज गाड्यांचे स्टॉल लावत अतिक्रमण करणाºया व्यावसायिकांवर महापालिकेने आजवर वारंवार कारवाई करुनही पुन्हा एकदा गाड्यांची वर्दळ पहायला मिळत आहे.गाड्यांनी पुर्वीपेक्षा जास्त प्रमाणात हातपाय पसरवायला सुरवात केली असून त्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहे. सारडा शाळेतील विद्यार्थ्यांना घ्यायला येणारे पालक, रिक्षा, व्हॅन, परिसरात दोन्ही बाजुंनी सतत असणारी सुरु वाहतुक, वाचनालय, क्रिडांगण असल्याने पादचाºयांचा राबता आणि त्यातच सकाळ, सायंकाळनंतर भेळपुरी, पाणीपुरी, चायनीज पदार्थांच्या गाड्यांच्या मालकांकडून गाड्यांव्यतिरीक्त रस्त्यावर खुर्च्या, टेबल टाकत मोठ्या प्रमाणात अडवून ठेवली जाणारी जागा यामुळे वाहतुक कोंडी होत असून पादचारी, वाहनधारक यांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे.महानगरपालिकेने उद्यानाभोवती संरक्षक भिंत घातली असली तरी त्या भिंतीच्या बाहेर रस्त्याच्या मध्यापर्यंत या हातगाडीवाल्यांकडून अतिक्रमण करीत बिनधास्तपणे व्यवसाय केला जात आहे. यामुळे अतिक्रमण तर होत आहेच पण ध्वनीप्रदुषण, प्रदूषण, वायुप्रदुषणातही भर पडत आहे. गाड्यांवर होत असलेल्या चायनीज पदार्थांमुळे धुर, ठसका होत असून आजूबाजुने जाणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. व्यावसायिकांकडून खरकटे, तेलकट पदार्थ, सांडलेले पदार्थ तेथून टाकून दिले जातात, त्याची स्वच्छताही केली जात नाही. महापालिकेने हा प्रश्न कायमचाच सोडवून टाकावा, वारंवार नागरिकांना तक्रार करायची वेळ आणू नये अशा भावना आता व्यक्त केल्या जात आहे.
वारंवार कारवाई करुनही नेहरु उद्यानाजवळ खाद्यपदार्थ स्टॉलचे अतिक्रमण कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:27 AM