नाशिक : शाळा सुरू झाल्या आणि पहिल्याच दिवशी शाळेतील मुलांना गणवेश देण्याची महापालिकेची परंपरा यंदाही खंडितच राहिली. लोकसभा आणि त्यापाठोपाठ महापालिकेच्या पोटनिवडणुकीमुळे यंदा शाळांकडे निधीच वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकला नाही. आता मात्र हा निधी वर्ग झाल्याने लवकरच गणवेश खरेदी सुरू होणार आहे.
महापालिकेच्या ९० शाळा असून, त्यात २७ हजार ३५९ मुले शिक्षण घेत आहेत. महापालिकेने डीबीटीचा प्रयोग करून बघितला, मात्र अनेक पालकांनी गणवेशच खरेदी केले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे गेल्यावर्षी शालेय व्यवस्थापन समित्यांमार्फत गणवेश खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळीदेखील बऱ्याच अडचणी आल्या. यंदा मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेच्या महासभेत अंदाजपत्रक मंजूर झाले, परंतु शासनाकडून समग्र शिक्षा अभियानाचा निधी शिल्लक होता तो आता प्राप्त झाला.
महापालिकेच्या वतीने आता विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी ९० शाळांच्या समित्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्राप्त निधी वर्ग झाला असून, आता या समित्याच खरेदी करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.