Nashik Crime News: नाशिकमधील ओझर टाउनशिप परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून पाच नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. घटनेनंतर पाचही संशयित फरार झाले असून, पोलिसांचे पथक संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम-६५(२), ७०(२), ३३२ (ब), ३५१ (३) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुलीवर तीन वेळा अत्याचार?
पीडित मुलीच्या आईने जी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, २, ९ आणि १६ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे घडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोपींनी या तीन दिवसांत तीन वेळा अत्याचार केले का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
एका आरोपीचे नाव आले समोर
तक्रारीनुसार, संशयित कृष्णा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासह अन्य पाच जणांनी मजुरीचे काम करणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर 'कोणाला सांगितले तर तुला मारून टाकू' असा दम संशयितांनी मुलीला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस घेताहेत आरोपींचा शोध
घटनेनंतर संशयित फरार झाले असून, पोलिसांचे पथक त्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे. तपास परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अद्विता शिंदे करीत आहेत. दरम्यान, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच पोलिसांना या धक्कादायक घटनेच्या तपासकामी सुचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.