मनमाड : येथील आगारातून जवळपास तीन महिन्यांनंतर मनमाड - नाशिक पहिली सर्वसामान्यांची लालपरी धावली. आगार प्रमुख यांच्याहस्ते पूजन करून कडक पोलीस बंदोबस्तात नाशिककडे बस रवाना झाली. दरम्यान, राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी मनमाड आगारात बसलेल्या संपकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली.
जवळपास तीन महिन्यांनंतर मनमाड आगारातून मनमाड - नाशिक ३ बसेस आणि १ बस मनमाड - नांदगाव अशा एकूण ४ बसेस धावल्या. मंगळवारी (दि. १) सकाळी अकराच्या सुमारास मनमाड - नाशिक ही बससेवा सुरू झाली. कंत्राटी वाहनचालक आणि मनमाड डेपोचे वाहक यांनी ही सेवा सुरू केली आहे. मनमाड बस आगाराला कंत्राटी पद्धतीने चार बसचालक उपलब्ध झाले आहेत, तर आगारातील तीन वाहक कामावर रुजू झाले आहेत.
बसस्थानकाचे प्रशासकीय कर्मचारी कामावर दाखल झाले. त्यामुळे मंगळवारी मनमाड ते नाशिक बस सेवा सुरू झाली. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी संपात उतरले आहेत. गेल्या ८४ दिवसांपासून हा संप सुरू आहे. नुकतेच जिल्ह्याच्या विविध भागांतून अंशतः बससेवा सुरू झाली होती. मात्र, मनमाड बस आगारातील बस वाहतूक पूर्णतः ठप्प होती. ही बससेवा मंगळवारपासून अंशतः का होईना सुरू झाली. सकाळी मनमाड येथून चांदवड, पिंपळगाव बसवंत मार्गे मार्गस्थ झाली आहे.
मनमाड बस आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निदर्शने केली व आपण संपावर ठाम असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अंशतः का होईना बससेवा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी सेवा बंद होती. मात्र, आजपासून ती सुरू झाले आहे. सध्या सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी असली तरी प्रवाशांना माहिती झाल्यानंतर सर्व एसटी सेवा सुरळीत होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
- प्रीतम लाडवंजारी, आगारप्रमुख, मनमाड