नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी एकही अर्ज माघार घेण्यासाठी आला नाही. त्र्यंबकेश्वर तालुका संचालक पदाच्या एका जागेसाठी संपतराव सकाळे यांची अविरोध निवड झाल्यानंतर आता पेठ तालुका संचालक पदाची निवडणूकही अविरोध होण्याची शक्यता आहे.दरम्यान, बुधवारी दिवसभर पेठ तालुका संचालक पदाच्या एका जागेचीही निवड अविरोध होण्यासाठी दिवसभर बैठका सुरू होत्या. त्यात प्रामुख्याने शिवसेना व कॉँग्रेस यांच्यातील नेत्यांच्या चर्चा झाल्याचे कळते. पेठ तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत एकूण अकरा मतदार असून त्यातील आठ मतदार यापूर्वीच सहलीला गेल्याची चर्चा आहे. पेठ तालुक्यातून एका जागेसाठी तीन अर्ज असून त्यात निवृत्ती महाले, सुरेश भोये व भगवान पाडवी यांच्या अर्जांचा समावेश आहे. बुधवारी सुरेश भोये व भगवान पाडवी यांच्या अर्जाबाबत चर्चा झाल्याचे समजते. पेठ बरोबरच सुरगाणा, कळवण, देवळा, बागलाण व सिन्नर तालुका संचालक पदाच्या निवडणुका अविरोध होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकूण २५१ अर्जापैकी पाच अर्ज बाद ठरविण्यात येऊन २४६ अर्ज वैध ठरविण्यात आले होते. बुधवारपासून (दि. १०) २३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २४ फेब्रुवारी रोजी अंतिम नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. ६ मार्च रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान घेण्यात येईल. मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी अर्ध्या तासानंतर मतमोजणीस प्रारंभ होईल. जिल्हा मजूर संघाच्या सभासद मतदारांची संख्या ११८९ असून, त्यापैकी ११२९ सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)
त्र्यंबक पाठोपाठ पेठही अविरोधाच्या वाटेवर
By admin | Published: February 11, 2016 12:21 AM