सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे मुख्य रस्त्यावरील शिवप्रकाश सोसायटीसमोर हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस सुरू असून, जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी सदरचे खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेच्या वतीने केले जात असताना, रस्त्याच्या मधोमधच भगदाड पडण्याच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यावरून जात असलेला सिमेंटचा ट्रक अचानक खड्ड्यात फसल्याने हा प्रकार उघडकीस आला. सुमारे चार ते पाच फूट खोल पडलेले हे भगदाड दोन वर्षांपूर्वी महापालिकेने तत्काळ बुजविले होते. त्यानंतर पुन्हा त्याच जागी भगदाड पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खड्ड्यात फसलेला ट्रक काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. त्यानंतर महापालिकेने सदर भगदाडामुळे हानी होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग केले. दरम्यान, महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हातात फलक घेऊन महापालिकेच्या कामकाजाचा निषेध केला. यावेळी अजिंक्य शिर्के, चैतन्य विसपुते, उदय देशमुख, आकाश शिर्के, श्रीकांत क्षत्रिय, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो ०९ सिडको, सिडको १)