नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी अर्ज माघारीच्या दिवशी ९५ उमदेवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आता २२१ उमेदवार नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीही अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठीचे प्रयत्न झाले.
२१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींमध्ये ३९३ जागांसाठी निवडणूक होत आहे. येवला, बागलाण, दिंडोरी, मालेगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, पेठ, कळवण, सिन्नर, देवळाल, नाशिक, चांदवड, इगतपुरी तालुक्यांमधील ग्रामपंचातयतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, ३९३ जागांसाठी उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. काही जागांवर केवळ औपचारिकता शिल्लक असून काही ठिकाणी एका जागेसाठीदेखील चुरस वाढली असल्याचे दिसून येते. गेल्या ३० नोव्हेंबरपासून पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३७४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. छाननी अंत ३५० नामनिर्देशनपत्र वैध ठरले. गुरुवारी अर्ज माघारीचा दिवस असल्याने अर्ज माघारीकडे सर्वंचे लक्ष लागून होते. अर्ज माघारीच्या निर्धारित वेळेत ९५ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून, २२१ उमेदवार आपले नशीब आजमविणार आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या. माघारीनाट्यासाठी उमेदवारांची शोधाशोध आणि प्रदीर्घ चर्चा झाल्याने दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज माघारीनंतर निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले असून, येवला-१८, बागलाण-१३, दिंडोरी-२५, मालेगाव-२१, निफाड-१६, त्र्यंबकेश्वर- ४१,नांदगाव-०६, पेठ-१७, कळवण-०१, सिन्नर- १४, देवळाली-०८, नाशिक-१२, चांदवड- १२, इगतपुरी-१८ याप्रमाणे २२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
--इन्फो--
स्थगित १८ जागांसाठी ३३ अर्ज
२३० ग्रामपंचायतींमध्ये ३९३ जागांसाठी पोटनिवडणूक होत असली तरी, काही जागांचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ जागा स्थगित ठेवण्यात आलेल्या असल्यातरी या जागांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या जागांचा निर्णय होणार आहे. त्यानंतर या जागांवरील निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे ३३३ वैध नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर ९५ उमेदवारांच्या माघारीनंतर २२१ इतके उमेदवार रिंगणात आहेत.