मालेगाव कॅम्प : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात संथ गतीने मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.सोमवारी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतच्या दोन तासाच्या कालावधीत ७ ते १० टक्के मतदान झाले. काही केंद्रांवर रांगा, तर काही केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली. मालेगाव हायस्कूल, शेख उस्मान हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. मालेगाव मध्य मतदारसंघात विशेषत: मालेगावचा पूर्व विभाग मुस्लीमबहुल वस्तीचे क्षेत्र आहे. येथे एकंदरीत प्रमुख पक्षांसह आजी-माजी आमदारांसह तेरा उमेदवार रिंगणात होते. या मतदार-संघातील काही केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली होती. तेथे विशेष पोलिसांची कुमक तैनात होती.सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत एटीटी हायस्कूल, जेएटी, शेख उस्मान, मालेगाव हायस्कूल, अरम प्रीमायसी, शाइन इन्स्टिट्यूट, जमहूर हायस्कूल, इस्माइल नांदेडी हायस्कूल या महत्त्वांच्या केंद्रांवर सरासरी १८ ते २१ टक्के मतदानाची नोंद झाली. मालेगावच्या एटीटी व मालेगाव हायस्कूल येथील एका मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर सर्व अधिकारी महिला होत्या. मालेगाव हायस्कूल शेख उस्मान या केंद्रावर जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह, डीवायएसपी मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन बंदोबस्तबाबत माहितीघेतली. येथील तैनात पोलिसांना सूचना केल्या.या मतदारसंघात पुरुषांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिव्यांग मतदारांना त्यांचे सहकारी मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअरने घेऊन येत होते. अनेक ठिकाणी पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवकांनी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहकार्य केले. अनेक केंद्रांवर मतदारांना आपली नावे मिळविण्यास अडचण निर्माण झाली होती तर काहींना केंद्र न समजल्याने ते मतदान न करता परत गेले.ईव्हीएममध्ये बिघाडशहरातील मुख्य एटीटी हायस्कूलमधील मतदान केंद्रक्र. ३९ मधील व आझादनगर येथील एका मतदार केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये सकाळच्या सत्रात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. यामुळे दोन्ही केंद्रांवर मतदारांनी गोंधळ घातला. मतदानाला विलंब झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी धाव घेत राखीव मशीन उपलब्ध करून दिले. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास मतदारांचा खोळंबा झाला. वेळेत पोलिसांनी हस्तक्षेप करून मतदारांना शांत करीत मतदान सुरू केले.
मालेगाव मध्यमध्ये दुपारनंतर लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:55 AM