लोहोणेर/भऊर : भऊर शिवारात बुधवारी पुन्हा बिबट्याच्या बछड्यासह मादीने दर्शन दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मादीचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे वनविभागकडे करण्यात आली आहे.पाच दिवसांपूर्वी बिबट्याचे बछडे सापडले होते. वनविभागाने तीन दिवसांचे बछडे पुन्हा सापडलेल्या जागी ठेवल्यानंतर दोन दिवसांनी मादी बछड्यांना घेऊन गेली. त्यानंतर बुधवारी (दि. २) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतकरी नानाजी सुकदेव पवार यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना अचानक बछडे सापडले. यामुळे घबराट निर्माण झाली. बिबट्याच्या मादीने गिरणा नदी पात्राकडे पोबारा केला. दरम्यान या परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागचे अधिकारी भालेराव यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी या परिसरातील शेतकरी नानाजी पवार, फुला जाधव, कुबेर जाधव, अमर जाधव यानी निवेदनाद्वारे केली आहे. या परिसरात मोरांची संख्या बऱ्यापैकी होती; मात्र बिबट्याचा वावर वाढल्याने येथील मोरही बिबट्याने फस्त केले असावेत, अशी भीती व्यक्त करीत आहेत.
भऊर परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन
By admin | Published: March 02, 2016 10:48 PM