Nashik Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. सक्षम उमेदवारांच्या शोधात काही मतदारसंघांची अदलाबदल सुरू असून विद्यमान खासदारांची तिकीटेही कापली जात आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने साताऱ्याची जागा सोडावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिक लोकसभा मतदारसंघ सोडण्याबाबत युतीत विचारविनिमय सुरू आहे. मात्र या भूमिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं तीव्र विरोध केल्याने अद्याप नाशिकमधील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु निवडणूक जवळ आली असून आता आणखी उशीर करणं योग्य नसल्याचं सांगत राष्ट्रवादीकडून उद्या छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची चिन्हं असून राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वत: भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिलेले आहेत. माझ्या उमेदवारीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याचे भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेकडून होणाऱ्या विरोधामुळे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. परंतु उद्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांचे नाव नाशिक लोकसभेसाठी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
शिवसेनेच्या विरोधाबाबत बोलताना भुजबळ काय म्हणाले होते?
नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याला शिवसेनेच्या गोटातून विरोध करण्यात आल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, "शिंदे गटाचे हेमंत गोडसे आहेत, ते उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. ते सध्या खासदार आहेत, त्यामुळे प्रयत्न करणं चूक नाही. भाजपचे १०० नगरसेवक आहेत आणि त्यांचे आमदारही आहेत, त्यामुळे भाजप नेतेही प्रयत्न करतात त्यात काही चूक नाही. ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचे आम्ही सगळे काम करणार," अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती.