सटाणा : नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शामजी नगर परिसरातील एका नामांकित फायनान्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर मौनी अमावास्याच्या दिवशी अज्ञात संशयितांकडून अघोरी पूजा घडवून आणल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असताना याबाबत पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
सटाणा येथील शामजी नगर परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नामांकित फायनान्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर बुधवार (दि.२९) मौनी अमावास्याच्या मध्यरात्री कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर, बाजूला तसेच सरंक्षक भिंतीजवळ हळद, कुंकू, लिंबू, बुक्का टाकलेला आढळून आला. त्या सोबतच काळी बाहुली व पूजा मांडलेली देखील आढळून आली.
हा प्रकार पहिल्यांदाच आढळून आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा पसरली. हा प्रकार नेमका कुणी व कशासाठी केला याबाबत नागरिकात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
कंपनीने केली साफसफाईया परिसरात उच्चभ्रू वर्ग वास्तव्यास असल्याने नेमका हा प्रकार करण्यामागील उद्देश काय? याबाबत तर्कवितर्क लढविली जात आहे. दरम्यान, फायनान्स कंपनीने याबाबत कुठलीही चर्चा होऊ नये म्हणून पोलिसात तक्रार देणे टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फायनान्स कंपनी चालकांनी या प्रकाराची चर्चा होण्यापूर्वीच परिसराची साफसफाई व स्वछता केली.