नाशिक : तळेगाव-अंजनेरी येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले असून संतप्त जमावाने पालकमंत्री गिरीेश महाजन यांना घेराव व धक्काबुक्की करीत पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करतानाच वाहने पेटवून दिल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. सुमारे तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या धुमश्चक्रीमुळे नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नाशिक शहरासह मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी पेटते टायर टाकून रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या धुमश्च्रक्रीत आठ पोलीस वाहनांसह सुमारे वीस बसेसचे व अनेक खासगी वाहनांचे नुकसान झाले असून दगडफेकीत ३५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.शनिवारी सायंकाळी त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथील पाच वर्षीय बालिकेला गावातीलच किशोरवयीन मुलाने खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर एका पडक्या खोलीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी मुलाला पकडून बेदम चोप तर दिलाच शिवाय पोलिसांच्या हवालीही केले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखे पसरताच, ठिकठिकाणी नागरिकांनी रात्रीच रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.रविवारी दुसऱ्या दिवशीही या घटनेचे तीव्र पडसाद कायम राहिले. सकाळी आठ वाजेपासून नाशिक-त्र्यंबकरोडवरील तळेगाव अंंजनेरी फाट्याचा ताबा संतप्त जमावाने घेऊन रास्ता रोको केला. नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर परिसरातील शेकडो तरुणांची येथे गर्दी झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासूनच ग्रामीण पोलिसांनी तळेगाव येथे तसेच नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करून गावात जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला, तसेच गावात बाहेरच्या व्यक्तींना जाण्यास मज्जावही केला. सकाळपासून आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करीत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केला व रात्रीपासून करण्यात आलेल्या कारवाईची माहितीही दिली. पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. याच दरम्यान, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त जात असताना आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे झाल्या घटनेची माहिती देत पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. संशयित आरोपीविरुद्ध यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले परंतु पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार केली. खडसे यांनीही आंदोलकांच्या भावनांशी सहमती दर्शवित, सरकार त्याची दखल घेईल असे आश्वासन दिले व त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले. पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेटदरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, शनिवारी रात्री उशिरा नाशकात दाखल झालेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी सकाळी सात वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन अत्याचारित बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच तिच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर तळेगाव फाट्यावर सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच पालकमंत्री महाजन व आमदार सीमा हिरे यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. साडेनऊ वाजेच्या दरम्यान पालकमंत्र्यांनी तळेगाव येथे घटनास्थळाची पाहणी केली तसेच गावातील नागरिकांची भेट घेऊन शांततेचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलीस प्रमुख अकुंश शिंदे, तहसीलदार राजश्री अहिरराव, उपअधीक्षक प्रशांत मोहिते उपस्थित होते. यावेळीही नागरिकांनी गावात चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत तक्रारी करून पोलीस दखल घेत नसल्याचे बोलून दाखविले, त्यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याची सूचना केली. घेराव, धक्काबुक्कीपालकमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता, त्यांनी थेट पालकमंत्री महाजन यांना रस्त्यावरच बसण्याचा आग्रह धरला. अखेर महाजन, आमदार सीमा हिरे यांनी आंदोलकांसमवेत रस्त्यावर ठाणही मांडले. ते म्हणाले, ‘झाला प्रकार दुर्दैवी असून, मी स्वत: पीडित मुलीची भेट घेऊन आलो, तिची प्रकृती व्यवस्थित आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, अतिप्रसंग झाला आहे, बलात्कार झालेला नाही असा वैद्यकीय अहवाल असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे’ असे सांगितले असता, पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी व गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बलात्कार झालाच नाही असे सांगून प्रकरणातील गांभीर्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी लावून धरली गेली. त्यातून गोंधळ उडाला. यावर महाजन यांनी आपल्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी, असे आवाहनही केले, परंतु आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने अखेर महाजन यांनी तेथून निघून जाणे पसंत केले. याच दरम्यान, त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत काहींनी पालकमंत्र्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसेबसे त्यांना वाहनात बसविले, परंतु आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून बराच वेळ वाहन अडवून धरले. वाहनांची जाळपोळ, अश्रूधुराचा मारारस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांची पोलिसांनी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले असताना जमावातील काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या एसटी बसवर (क्रमांक एम.एच. १२-ईएफ-६२३०) दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात एसटीच्या काचा फुटल्या. या घटनेचे चित्रीकरण केले जात असल्याचे लक्षात आल्यावर जमावाने चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला लक्ष्य केले व त्याला बेदम चोप देण्यास सुरुवात केली. ही बाब जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच, आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांनी मारहाण होणाऱ्या तरुणाला जमावाच्या ताब्यातून सोडविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यातून जमाव पांगला, मात्र समोरच्या डोंगरावर चढून त्याने पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. संतप्त जमावाने पोलीस वाहनांनाही लक्ष्य केले, यात अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. पोलिसांनी जमाव काबूत आणण्यासाठी प्रत्युत्तरादाखल अश्रूधुराचा वापर केला. जवळपास एक डझनाहून अधिक नळकांड्या फोडण्यात आल्या; मात्र त्यामुळे जमाव आणखीनच संतप्त झाला. समोरासमोर दगडफेक करतानाच, एका गटाने पोलिसांच्या सुमो व बोलेरो अशा दोन्ही वाहनांना रस्त्यावर पलटी करून पेटवून दिले. क्षणार्धात या दोन्ही वाहनांनी पेट घेतला, एकीकडे वाहनांना लक्ष्य व दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक होत असतानाही त्यांनी संयमाची भूमिका घेतली. दंगल काबूत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वरुण अस्त्राच्या माध्यमातून पेटलेली वाहने विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांच्यावरही दगडफेक करून व्यत्यय आणण्याचा प्रकार सुरूच होता. सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू असलेला हा तणाव दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कायम होता. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले, तसेच अनेक खासगी वाहनांचेही नुकसान झाले. दुपारी एक वाजेनंतर त्र्यंबकरोडवरील वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. तत्पूर्वी या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारचा दिवस असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी बाहेरगावाहून अनेक भाविक आलेले होते. ते या आंदोलनामुळे रस्त्यातच अडकून पडले होते. मुंबई महामार्ग ठप्पशनिवारी रात्रीपासून दुतर्फा ठप्प झालेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी पहाटे पाच वाजेपासून सुरळीत केली. परंतु पुन्हा रविवारी सकाळपासून आंदोलक महामार्गावरील घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे, राजूरफाटा, विल्होळी व पाथर्डी फाटा, द्वारका चौक येथे रस्त्यावर उतरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु अन्य मार्गावरही आंदोलन सुरू असल्याने सर्वच रस्ते ठप्प झाले. दुपारी चार वाजेनंतर आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
जिल्ह्यात संतापाचा आगडोंब
By admin | Published: October 10, 2016 12:38 AM