नांदूरवैद्य : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढतच चाललेल्या लॉकडाउनने गोरगरीब जनता, शेतकरी, हातावर पोट भरणारे मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर गरीब-होतकरूंना तत्काळ शिधापत्रिका मिळाव्यात, यासाठी श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. रविवारी (दि. ३१) सहाव्या दिवशीही प्रशानाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. परिणामी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.वाढत चाललेल्या लॉकडाउनच्या संधीचा फायदा येथील व्यापारी व दुकानदारांनी उचलला आहे. एकीकडे गोरगरीब जनता आपल्या कुटुंबासह पोटाला चिमटा घेऊन अर्धपोटी रहात आहे, तर दुसरीकडे व्यापारी, दुकानदार आपले पोट तुडुंब भरत आहेत. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या पुढाकारातून संघटनेचे कार्यकर्ते गरिबांना शिधापत्रिका मिळाव्यात, या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.तालुकाध्यक्ष संजय शिंदे, नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नीता गावंडा, तालुका सचिव शांताराम भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर सकाळपासून सायंकाळपर्यंत हक्क आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी इगतपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे विनोद गोसावी, सचिन देसले व इतर कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
कोरोना प्रादुर्भावामुळे गोरगरीब कष्टकरी, आदिवासी लोकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत शिधापत्रिका देण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. शासन-प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन आक्रमक करू.- संजय शिंदे, तालुकाध्यक्ष, श्रमजीवी संघटना, इगतपुरी