नाशिक : जुनी पेन्शन लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून वर्ग तीन, चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (दि.१४) पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शासकीय कार्यालयांबाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनांसह घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय आस्थापनांबाहेर जमा होऊन निदर्शने करण्यात आली. या संपामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये केवळ अधिकारी उपस्थित आणि कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. त्यातही सर्वाधिक फटका जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना सहन करावा लागला.
सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे तसेच मार्च २०२३ मध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन पुर्तता न केल्याने तसेच बुधवारी झालेल्या बैठकीत ही तोडगा न निघाल्याने कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने दिनांक १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहॆ. सरकारी कर्मचारी, शिक्षक, परिचारिका संपात सहभागी झाले आहेत. आरोग्य विभागातील परिचारिका ही संपात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाबाहेर तृतीय श्रेणी कर्मचारी, परिचारीका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता तसेच जिल्हा परिषदेसमोर तसेच ईएसआयसी हॉस्पिटल बाहेरही कर्मचाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली.