घोटी : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने दुधाला भाववाढ मिळावी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १६) घोटी टोल नाक्याजवळ आंदोलनाचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवत हाणून पाडला. दरम्यान या आंदोलकांनी कसारा घाटात दूध टँकर अडवून टायरची हवा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी धाव घेत आठ आंदोलकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी आज मुंबईला दूधपुरवठा होऊ न देण्यासाठी आंदोलन करण्याची हाक दिली होती. दरम्यान, मुंबईला सर्वाधिक दूधपुरवठा संगमनेर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आदी भागातून होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घोटी टोल नाक्याजवळ आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. पोलिसांनी रविवारी रात्रीपासून टोल नाका आणि परिसरात फौजफाटा तैनात केला होता. आंदोलकांनी आंदोलनाची वेळ दुपारी १ वाजता देऊनही आंदोलकांनी पोलिसांना चकमा देत कसारा घाटात जाऊन दूध टँकर अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, उपअधीक्षक अतुल झेंडे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तब्बल पाच दुधाचे टँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना केले.पोलिसांनी टोल नाका परिसरातून जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांच्यासह रवींद्र महादू पवार, देवळा तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, गोविंद अण्णा पवार यांना ताब्यात घेतले.
आंदोलनापूर्वीच आंदोलक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:28 AM