मनमाड : येथील तहसीलदार कार्यालयासमोर शेती-बिनशेती आॅनलाइन सातबारा उतारा चावडीवाचन कार्यक्रम संपन्न झाला. येथील सातबारा उताºयांचे संगणकीकरण करण्यात यावे या मागणीसाठी वेळोवेळी तीव्र आंदोलने करणाºया शिवसेना-रिपाइं पदाधिकाºयांनाच सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आल्याने ‘आंदोलनकर्ते अतिथी भव’ असा प्रत्यय सर्वांना अनुभवयास मिळाला.जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार पाचशे सातबारा उतारे असलेल्या मनमाड तलाठी कार्यालयात या उताºयांचे संगणकीकरण करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होते. संगणकीकरणाच्या कामामुळे शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना उताºयाअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.शहरातील शेती व बिनशेती क्षेत्राचा आॅनलाइन सातबारा उताºयांचा चावडीवाचन कार्यक्रम तलाठी कार्यालयासमोर संपन्न झाला. अध्यक्षस्थानी तहसीलदार चंद्रकांत देवगुणे होते. प्रमुख अतिथी म्हणून मयूर बोरसे, सुनील पाटील, सुनील हांडगे, दिनेश केकाण, प्रमोद पाचोरकर, खालीद शेख, गंगाभाऊ त्रिभुवन, योगेश निकाळे उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. तलाठी आर. आर. घाडगे यांनी उपक्रमाचा हेतू विशद केला. सर्व खातेदारांनी आपल्या मूळ हस्तलिखित ७/१२ उताºयावरून संगणकीकृत सातबारा उताºयावरील क्षेत्र, आकार, नाव अन्य बाबींची तपासणी करावी व काही दुरुस्ती असल्यास लिखित स्वरुपात सूचना कराव्यात, असे आवाहन तहसीलदार देवगुणे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले दाखले तहसीलदारांच्या हस्ते प्राचार्य सदाशीव सुतार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
आंदोलनकर्ते ‘अतिथी’ भव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:08 PM