लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ‘फौज में मौज’ हा विचार प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी मनात आणू नये, असा गुरुमंत्र स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर यांनी दिला. भारत सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत पंचविशीतील तरुण मोठ्या संख्येने नाशिक रोडच्या तोफखाना केंद्रात सैन्य प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहेत. बारावी उत्तीर्ण करून दाखल झालेले हे युवक दिवस-रात्र एक करत आहेत. पहिल्या टप्प्यात २,६०० पेक्षा जास्त युवक प्रशिक्षण घेत आहेत.
८ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण
३१ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘अग्निवीर’ देशसेवेत दाखल होणार आहेत. सोमवारी सकाळी येथील ‘ग्यानी स्टेडियम’च्या मैदानावर अग्निवीरांच्या तुकडीसोबत अय्यर यांनी थेट संवाद साधला. त्यावेळी कमांडंट ब्रिगेडियर ए. रागेश यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.
‘जी हां साहब, हम खूश हैं...’लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर यांनी अग्निवीरांशी हितगुज केले. यावेळी त्यांनी ‘यहां सब खूश हैं ना..?’ असा प्रश्न केला. तेव्हा सर्वांनी उंच स्वरात ‘जी हां साहब, हम खूश हैं...’ असा प्रतिसाद दिला. अग्निवीर हे आधुनिक व सक्षम असे सैनिक असायला हवे, तुमच्यावर सैन्य दलाला व समाजाला अभिमान वाटायला हवा, अशी कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करा, असा सल्लाही अय्यर यांनी यावेळी दिला.