नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोकामगारवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको प्रभागात नव्या रचनेनुसार दोन नगरसेवकांची संख्या वाढली आहे. या प्रभागांमध्ये काही विद्यमान नगरसेवकांबरोबरच माजी नगरसेवकांना त्यांच्या मूळ प्रभागातून निवडणूक लढविता येणार नसल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागात जावे लागणार आहे. सिडकोतील एकूण सहा प्रभाग झाले असून, यात जुना प्रभाग क्रमांक ४४ हा तुटला आहे, तर नव्या प्रभागातही दुसऱ्या प्रभागातील प्रभागांचा समावेश झाल्याने आजी-माजी नगरसेवकांना अडचणींचा ठरणार आहे. सिडको प्रभाग - २४ : नव्या रचनेनुसार प्रभाग २४ मध्ये सध्याच्या प्रभाग ४१ व ४२ चा संपूर्ण भाग आला असून, आजूबाजूचा काही परिसराचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग २४ (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, २४ (ब) - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, २४ (क) - सर्वसाधारण महिला, २४ (ड) - सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंभळे, राजेंद्र महाले, कल्पना पांडे व अश्विनी बोरस्ते यांना या प्रभागातून निवडणूक लढविण्याची संधी आहे. सिडको - प्रभाग २५ : प्रभाग २५ मध्ये सध्याचा प्रभाग ४७ व ४८सह प्रभाग ४१ चा व ४६ चा काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या प्रभागाची रचना करताना यात चार प्रभागांचा म्हणजेच आठ नगरसेवकांचा समावेश असलेला प्रभाग आहे. प्रभाग २५ (अ) - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, २५ (ब) - सर्वसाधारण महिला, २५ (क) - सर्वसाधारण महिला, २५ (ड) - सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, डॉ. अपूर्व हिरे, अनिल मटाले, राजेंद्र महाले, हर्षा बडगुजर, कांचन पाटील, अश्विनी बोरस्ते, शोभा निकम आदिंचा प्रभागाचा भाग थोड्या अधिक प्रमाणात समाविष्ट झाला आहे.प्रभाग २६ : प्रभाग २६ मध्ये सध्याचा प्रभाग ४९ व ५० चा भागाचा समावेश करण्यात आला आहे. सध्याचा प्रभाग ५० हा सातपूर प्रभागात असून, नवीन रचनेनुसार प्रभाग ५० हा सिडको प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभागातील विद्यमान नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, सचिन भोर, सुवर्णा मटाले, नंदिनी जाधव यांना या ठिकाणाहून उमेदवारी करण्याची संधी आहे. प्रभाग - २७ : या प्रभागात दोन जागा राखीव झाल्या असून, एक नागरिक मागासवर्ग महिला व एक सर्वसाधारण महिलांसाठी सोडण्यात आला आहे. यामुळे सध्याचा प्रभाग ४४ चे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांना मात्र या प्रभागातून उमेदवारी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले, परंतु जायभावे यांना प्रभाग २९ मधून उमेदवारी करण्याची संधी दिसत आहे, तर विद्यमान नगरसेवक शीतल भामरे या महिला असल्याने त्यांना नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग २७, २८ व २९ या तीनही प्रभागात निवडणूक लढविण्याची संधी आहे. प्रभाग - २८ : प्रभाग २८ मध्ये सध्याचा मूळ प्रभाग ४९ व ४५ च्या भागासह प्रभाग ४८ व प्रभाग ४४ च्या काही भागांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, लक्ष्मण जायभावे, सुवर्णा मटाले, शीतल भामरे, रत्नमाला राणे, तानाजी जायभावे आदि नगरसेवकांचा भागाचा समावेश आहे, परंतु यातील काही विद्यमान नगरसेवक हे दुसऱ्या भागातून उमेदवारी करणार असल्याचे समजते.प्रभाग - २९ : नव्या रचनेनुसार प्रभाग २९ मध्ये सध्याचे मूळ प्रभाग ४३, ४४, ४५, ४६ आदिंचा थोड्या-अधिक भागांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रभागाचे आरक्षणामध्ये प्रभाग २९ (अ)- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, २९ (ब)- सर्वसाधारण महिला, २९ (क)- सर्वसाधारण, २९ (ड) - सर्वसाधारण असे आहे. यामुळे या प्रभागातून अनेकांना निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. प्रभाग ४४ चे विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांना त्यांचा सध्याचा प्रभाग ४४ हा महिलांसाठी राखीव झाल्याने प्रभाग २९ मधून उमेदवारीसाठी संधी आहे. याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, अॅड. अरविंद शेळके, शिवाजी चुंभळे, रत्नमाला राणे, माजीनगरसेवक सुमन सोनवणे, सतीश खैरनार तसेच मुकेश शहाणे, देवा वाघमारे, रमेश उघडे, विष्णू पवार, भागवत आदिंनाही या ठिकाणाहून उमेदवारी करण्याची संधी आहे.
आजी-माजी नगरसेवकांच्या प्रभागाला बसला धक्का
By admin | Published: October 08, 2016 1:34 AM