लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात नको तेव्हा येणारा अवकाळी पाऊस व गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुुरु असलेली दुष्काळाची मालिका यामुळे येथील शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाल्याने शेतीपूरक व्यवसाय संकटात सापडले आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाच-सहा वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी, पंचाळे, देवपूर, वावी, मीठसागरे, शहा, धनगरवाडी, शिंदेवाडी, वडांगळी, खडांगळी, मेंढी, सोमठाणे, उजनी, दहिवाडी, सांगवी, पुतळेवाडी, विघनवाडी, निमगाव सिन्नर, गुळवंच, दक्षिणेकडील मऱ्हळ, निऱ्हाळे, खंबाळे, दोडी, नांदूरशिंगोटे, भोकणी, खोपडी आदी भागात टंचाईची झळ अधिक प्रमाणात आहे. गेल्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी शेतमालास भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणी आहे. गेल्या पाच वर्षांत जिरायती भागात शेती तोट्यात गेल्याने बळीराजा चिंतातुर आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही त्याचा फारसा फायदा झाला नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. मध्यंतरी तालुक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्यासह गारपीट झाली. त्यात द्राक्ष व डाळींबबागांचे नुकसान झाले, तर भाजीपाला आणि चाऱ्याची पिके वाया गेली होती. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी, सर्वसामान्यांसह मजूरही हवालदिल झाले आहेत. पिण्याचे पाणी, मजुरांना रोजगार, जनावरांना चारा आदी समस्या भेडसावत आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित केवळ खरीप पिकांच्या उत्पन्नावरच अवलंबून आहे. शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आल्याने व अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागल्याचे चित्र होते. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध, कुक्कुटपालन आदी व्यवसाय निवडले आहे. मात्र त्यासाठीचा मुख्य व्यवसायच अडचणीत आल्यावर पाणी आणि चाराटंचाईने हे दोन्हीही व्यवसाय सध्या डबघाईस आल्याचे शेतकरी सांगत आहेत. जनावरांना ओला चारा बागायती भागातून घेऊन यावा लागतो. निफाड, कोपरगाव व सिन्नरच्या पूर्वेकडील काही बागायती क्षेत्रातून गुरांना चारा म्हणून ऊस विकत घ्यावा लागतो आहे. कुक्कुटपालकांना पक्ष्यांंना पिण्यासाठी टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. उन्हाळ्यात माणसांना टॅँकरने पाणी मिळते मात्र जनावरांना पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहतो. यावर्षी उन्हाळ कांद्याला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळूनही आर्थिक अडचण सहन करावी लागत आहे. शेतीपूरक व्यवसाय संकटात आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
शेतीपूरक व्यवसायही संकटात!
By admin | Published: May 15, 2017 10:32 PM