देवळा : जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी गट - क (तांत्रिक) या पदाचे राज्य शासनाच्या कृषी विभागात, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद गट- ब (कनिष्ठ-राजपत्रित) या पदनामाने नवीन संवर्गात रूपांतरण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या नवीन संवर्गास राजपत्रित दर्जा प्रदान करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिली.राज्य शासनाच्या कृषी विभागातील कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ) व जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी गट- क (तांत्रिक) या पदाची वेतनश्रेणी, कर्तव्ये व जबाबदाºया समान आहेत. परंतु जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी हे पद अराजपत्रित असून, कृषी विभागाकडील हेच पद हे राजपत्रित दर्जाचे आहे. त्यामुळे, समानतेच्या तत्त्वाने जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी या पदाला राजपत्रित दर्जा देण्याची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनतर्फे मागणी करण्यात येत होती. या बाबी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, गट-ब (कनिष्ठ राजपत्रित) हे राज्य सरकारी कर्मचारी असतील. त्यांना राजपत्रित दर्जा असेल. त्यांची आस्थापना राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अखत्यारित राहील. त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात करण्यात येईल आणि कृषी विभागाच्या सध्या प्रचलित नियमांनुसार पदोन्नती होईल. जिल्हा परिषदेमधील कृषी अधिकारी गट - क (तांत्रिक) हा संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात येईल. या पदासाठी असलेल्या महाराष्ट्र विकास सेवेतील पदोन्नतीच्या पदावर आता जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (कृषी) हे पदोन्नतीस पात्र राहणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.
कृषी अधिकाऱ्यांना आता गट ब मधील राजपत्रित संवर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 6:35 PM